'पहिल्या सीनसाठी तयारी करताना...'; 'शिवा' मालिकेला एक वर्ष पूर्ण, अभिनेत्रीची खास पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 13:32 IST2025-02-13T13:32:12+5:302025-02-13T13:32:54+5:30
'शिवा' मालिकेला नुकतंच वर्ष पूर्ण झालंय. त्यानिमित्ताने मालिकेतील प्रमुख अभिनेत्रीने लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे (shiva, purva kaushik)

'पहिल्या सीनसाठी तयारी करताना...'; 'शिवा' मालिकेला एक वर्ष पूर्ण, अभिनेत्रीची खास पोस्ट चर्चेत
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'शिवा'. (shiva marathi serial) ही मालिका TRP च्या शर्यतीत कायम शिखरावर आहे. या मालिकेच्या वेगळ्या कथानकामुळे सुरुवातीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 'शिवा' मालिकेला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालंय. या वर्षभरात मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. अशातच मालिकेत शिवाची प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा कौशिक-फडकेने 'शिवा' मालिकेच्या वर्षपूर्तीनिमित्त सोशल मीडियावर केलेली खास पोस्ट चर्चेत आहे.
'शिवा' मालिकेला वर्ष पूर्ण; पूर्वा लिहिते-
मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या पूर्वा कौशिकने सेटवरील खास फोटो शेअर केलेत. हे फोटो शेअर करुन पूर्वा लिहिते की, "शिवा - एक वर्ष पूर्ण! अगदी कालच पहिल्या एपिसोडची धडधड होती, पहिल्या सीनसाठी तयारी करताना मनात उत्सुकता आणि टेन्शन दोन्ही होतं. पण बघता बघता शिवा ला एक वर्ष पूर्ण झालं! हा प्रवास फक्त एक भूमिका साकारण्याचा नव्हता, तर एका वेगळ्या विश्वाचा अनुभव घेण्याचा होता."
"शिवाने मला खूप काही शिकवलं—धैर्य, आत्मविश्वास आणि स्वतःवर ठाम राहण्याची ताकद. तिच्या प्रत्येक संघर्षात मी स्वतःला शोधलं, तिच्या हसण्यात मी आनंद अनुभवला, आणि तिच्या अश्रूंमध्ये मी नकळत गुंतत गेले. पण हा प्रवास इतका सुंदर झाला, तो तुमच्या प्रेमामुळे! प्रत्येक मेसेज, प्रत्येक कमेंट, आणि तुम्ही दिलेला सपोर्ट—सगळंच मनापासून स्पेशल वाटतं. तुमच्या या निस्वार्थ प्रेमाशिवाय हे शक्यच नव्हतं!" अशाप्रकारे पूर्वाने पोस्ट लिहिली आहे. पूर्वाची पोस्ट दिसताच अनेकांनी तिचं आणि मालिकेच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलंय.