घरी बसून आता कंटाळा आलाय...! ‘CID’नंतर एसीपी प्रद्युम्न यांना काम मिळेना...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 11:36 AM2022-01-19T11:36:44+5:302022-01-19T11:38:17+5:30
होय, तूर्तास शिवाजी साटम कामाच्या शोधात आहेत. ‘सीआयडी’ मालिकेनंतर शिवाजी साटम यांना काम करायचं आहे. पण...
सीआयडी (CID) ही छोट्या पडद्यावरील तुफान गाजलेली मालिका. आजही ही मालिका आठवली की, एसीपी प्रद्युम्न (ACP Pradyuman), दया यांचे चेहरे डोळ्यांपुढे येतात. तोड दो दरवाजा दया , कुछ तो गडबड है दया हे डायलॉगही पाठोपाठ आठवतात. मराठमोळे अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) यांनी या मालिकेत एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारली होती. पण ‘सीआयडी’ ही मालिका संपली, तेव्हापासून शिवाजी साटम छोट्या व मोठ्या पडद्यापासून दूर आहेत.
शिवाजी साटम यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु त्यांना खरी ओळख मिळाली ती ‘सीआयडी’ या मलिकेमुळे. या मालिकेमुळे ते एसीपी प्रद्युम्नच्या रूपात घराघरात पोहोचले. हेच कारण आहे की, आजही लोक त्यांना शिवाजी साटम या नावाऐवजी एसीपी प्रद्युम्न या नावानं ओळखतात. तूर्तास शिवाजी साटम कामाच्या शोधात आहेत. होय, ‘सीआयडी’ मालिकेनंतर शिवाजी साटम यांना काम करायचं आहे. पण मनासारखं काम मिळत नसल्यानं ते काहीसे अस्वस्थ आहेत.
हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला. ते म्हणाले,‘मला पुन्हा काम करायचं आहे. परंतु मला त्याच त्याच भूमिका नकोशा वाटत आहेत. माझ्याकडे खूप ऑफर्स येत आहेत, असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण माझ्याकडे सध्या काहीच ऑफर्स नाहीत. हे खरं आहे. मला हे सांगायला कसलीही लाज वाटत नाही. एक-दोन ऑफर्स आल्या होत्या. परंतु त्या आवडल्या नाहीत. मला काहीतरी नवं हवं आहे. मी मराठी रंगमंचावर काम केलं आहे. त्यामुळे ज्या भूमिका मला रुचतात त्याच मी निवडतो.
घरी बसून कंटाळलो आहे....
एसीपी प्रद्युम्नची भूमिका पुन्हा मिळाली तर ती तुम्ही साकाराल का? असं विचारलं असता ते म्हणाले, ‘ही भूमिका मिळाली तर ती मी एका पायावर स्वीकारले. ही भूमिका मी आणखी अनेक वर्ष न कंटाळता साकारू शकतो. सीआयडी मालिका परत सुरू झाली तर नक्कीच एसीपी प्रद्युम्नची भूमिका करायला मला आवडेल. कोरोनापासून काम नसल्यामुळे मी रिकामा आहे आणि घरी बसून कंटाळलो आहे.