कुछ तो गडबड है दया! शिवाजी साटम यांनी सांगितलं CID मालिका बंद होण्याचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 11:15 AM2024-10-07T11:15:46+5:302024-10-07T11:16:38+5:30
शो बंद होण्याचं कारण ठरले अमिताभ बच्चन?
सोनी वाहिनीवरील CID ही मालिका सगळ्यांनाच माहित आहे. या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. १९९८ ते २०१८ पर्यंत म्हणजेच तब्बल २० वर्ष ही मालिका चालली. एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजीत, फ्रेडी ही सर्वच पात्र गाजली. प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या केस सोडवताना प्रेक्षकही टीव्हीसमोर बसून असायचे. 'कुछ तो गडबड है दया', 'दया तोड दो दरवाजा' हे डायलॉगही गाजले. इतक्या वर्षांनी ही मालिका बंद व्हायचं कारण खुद्द एसीपी प्रद्युम्न म्हणजेच अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) यांनी सांगितलं आहे.
अभिनेते शिवाजी साटम 'फ्रायडे टॉकिज'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, "आम्ही चॅनलला सतत विचारायचो की शो का बंद होत आहे. केबीसी आणि आमच्या मालिकेत काटे की टक्कर असायची. हा टीआरपी जरा पडला होता पण कोणत्या शोचा पडत नाही. शो बंद करण्याआधी त्यांनी शेड्युलमध्येही बदल केले. आधी शोची वेळ रात्री १० ची होती मात्र नंतर ही वेळ १०.३० करण्यात आली. तर कधीकधी १०.४५ असायची. यामुळे प्रेक्षकांचं दुर्लक्ष झालं."
ते पुढे म्हणाले, "कदाचित तेव्हा चॅनल आणि निर्मात्यांमध्ये मतभेदही झाले होते. त्यांना निर्माता बदलायचा होता. पण आम्ही इतकी वर्ष सोबत काम केले त्यामुळे सगळ्यांमध्ये मैत्री होती. आम्ही एक टीम म्हणून पुढे आलो होतो."
'सीआयडी' हा टेलिव्हिजनवरचा सर्वात जास्त काळ चालणारा शो आहे. बी पी सिंह यांनी या क्राइम शोची निर्मिती केली. शिवाजी साटम यांनी एसीपी प्रद्युम्न, दयानंद शेट्टीने इन्स्पेक्टर दया, आदित्य श्रीवास्तवने इन्स्पेक्टर अभिजीत, दिनेश फडनीसन फ्रेड्रिक्स आणि नरेंद्र गुप्ता यांनी डॉ साळुंखेची भूमिका साकारली होती.