Shivali Parab : हास्यजत्रेच्या ऑडिशनमध्येच झाला होता पचका! शिवाली म्हणाली, "आजही त्यावरुन माझी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 01:19 PM2023-05-07T13:19:21+5:302023-05-07T13:22:07+5:30
शिवाली म्हणजे 'छोटा पॅकेट बडा धमाका' आहे. पण तिची हास्यजत्रेच्या ऑडिशनवेळी चांगलीच फजिती झाली होती.
महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) म्हणजे सध्याचा सर्वांचा लाडका आणि लोकप्रिय कार्यक्रम. या विनोदी कार्यक्रमातील सर्वच कलाकार आज स्टार झालेत. यातलीच एक सर्वांची लाडकी शिवाली परब (Shivali Parab). शिवाली म्हणजे 'छोटा पॅकेट बडा धमाका' आहे. ती हास्यजत्रेचा महत्वाचा भाग आहे. पण शिवालीची हास्यजत्रेच्या ऑडिशनवेळी चांगलीच फजिती झाली होती.
शिवाली सांगते, "त्यावेळी मी अगदीच नवखी होते. इतकी नवीन की हास्यजत्रेसाठी ऑडिशन द्यायलाच आले होते. कोरोना आणि लॅाकडाऊनच्या अगोदर आमचं ऑफिस दुसऱ्या ठिकाणी होतं. त्याच ऑफिसमध्ये मी हास्यजत्रेचं ऑडिशन द्यायला गेले होते. मला स्क्रिप्ट वाचायचं होतं, पण मला त्याबाबत काहीच कल्पना नव्हती. महाराष्ट्राची हास्यजत्राचं बरंचसं काम दशरथ शिरसाट सांभाळतात. त्यांना मी दशरथदादा म्हणते. मी गेले तेव्हा तेच ऑफिसमध्ये होते. खरं तर त्यांचाच मला एकदा कॉल आला होता की, मी दशरथ बोलतोय. तुला उद्या ऑफिसमध्ये यायचं आहे. जमेल का वगैरे काही गोष्टी त्यांनी विचारल्या. मी म्हटलं, हो येईन ना... मी तिथे गेले. आमचं स्क्रिप्ट रीडिंग झाल्यावर मी दशरथदादाला सिलेक्शन वगैरे कसं होणार याबाबत विचारलं.
तो म्हणाला की, पुढे कसं काय होतं ते मी कळवतो. सरांना विचारून सांगतो. माझं असं झालं की, सरांना म्हणजे नक्की कोणाला... काय विचारायचं आणि कोणत्या सरांना विचारायचं आहे... कारण सर तर तुम्हीच आहात ना... पण मी जेव्हा रीडिंग करत होते, तेव्हा माझ्यासमोर दोन व्यक्ती बसल्या होत्या, ज्या अगदी बारकाईनं माझं ऑडिशन पाहत होत्या. ते होते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे... मला असं वाटलं की, ते दोघे चॅनलचे आहेत. चॅनलमध्ये वयस्कर लोकं प्रोड्युसर्स वगैरे पदांवर कार्यरत असतात. त्यापैकी ते असतील असं वाटलं होतं. मी दशरथदादालाच दिग्दर्शक समजले होते आणि माझा अक्षरश: पचका झाला होता.
दशरथदादाने सांगितल्यावर मला समजलं की शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे आहेत. नंतर एकदा सहज बोलता बोलता मी गोस्वामी आणि मोटे यांना याबद्दल सांगितलं. ते ऐकून दोघेही खूप हसले. त्यानंतर जेव्हा कधी हा किस्सा ऐकवला जातो, तेव्हा माझी टर उडवली जाते."