'हा' प्रश्न सोडून त्याला काहीही विचारा, लग्नाच्या बोलणीआधी शिवानीने घरच्यांना सांगितलेलं बजावून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 11:58 IST2025-02-21T11:57:25+5:302025-02-21T11:58:18+5:30
शिवानी-अंबरनं लग्नाआधीचा एक किस्सा सांगितला.

'हा' प्रश्न सोडून त्याला काहीही विचारा, लग्नाच्या बोलणीआधी शिवानीने घरच्यांना सांगितलेलं बजावून
अभिनेता अंबर गणपुळे (Ambar Ganpule) आणि अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) हे मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपल आहे. या दोघांनी गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) शुभमुहूर्तावर साखरपुडा (Engagement) केला होता. त्यानंतर आता गेल्या २१ जानेवारी रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण, तुम्हाला माहितेय लग्नाची बोलणी करण्याआधी शिवानीनं तिच्या घरच्यांना अंबर गणपुळेला एक प्रश्न विचारायचा नाही, अशी सक्त ताकीद दिली होती.
नुकतंच शिवानी आणि अंबर यांनी राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी लग्नाआधीचा एक किस्सा सांगितला. लग्न होण्यापूर्वी अंबर गणपुळे आणि शिवानी सोनारचं कुटुंब भेटलं होतं. तेव्हा अंबर गणपुळेला घराबद्दल एकही प्रश्न विचारायाचा नाही, असं शिवानीने तिच्या कुटुंबीयांना बजावून सांगितल्याचा खुलासा अंबरने केला. तो म्हणाला की, "मला तिची एक गोष्ट खूप आवडली होती. मी जेव्हा तिला प्रपोज केलं होतं. तेव्हा मी तिला माझी परिस्थिती सांगितली होती. माझं घर नाहीये. मी घर घेईन. पण, आता एवढ्यात कुठेतरी मला दिसत नाहीये. त्यामुळे आता तू सांग तुला करायचं आहे की नाही? उद्या जाऊन असं नको व्हायला, तू हे सांगितलं नाहीस. पण, जेव्हा तिचे घरचे बोलायला येणार होते, तेव्हा तिने घरच्यांना हे सांगितलं होतं की, त्याला तुम्ही काहीही विचारा. पण त्याला तुम्ही घराबद्दल काही विचारायचं नाही. कारण मला काही अडचण नाही, उद्या भाड्याच्या घरात राहायला मी तयार आहे. त्यामुळे हे सोडून सगळं विचारा. कारण या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नाहीये. त्याच्या डोक्यात काय आहे, हे मला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही हे विचारू नका. देव नशिबाने लग्नाच्या आधी माझं घर झालं".
शिवानी सोनार म्हणाली, "आमचा गुढीपाडव्याच्या दिवशी साखरपुडा झाला. दसऱ्या दिवशी नवं घर घेतलं. मी खूप खुश झाले. आमच्या बाबतीत अशा गोष्टी खूप वेळेला घडतात. जास्त वेळा मागितली नाही ना तर ते आपोआप मिळत. हे आमच्या दोघांच्या बाबतीत नशीबाने होतं. एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्याच्या मागे लागतं नाही. शांतपण केलं तर सगळं होतं".
शिवानी आणि अंबर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. स्टार प्रवाहच्या 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) या मालिकेतून अंबर प्रसिद्धीझोतात आला होता. तर शिवानी 'राजा राणीची गं जोडी' (Raja Ranichi Ga Jodi Wedding) आणि 'तू भेटशी नव्याने' (Tu Bhetashi Navyane) या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली आहे. लग्नाच्या आधी शिवानी सोनार 'तू भेटशी नव्याने' मालिकेत मुख्य भूमिकेत होती. तर अंबर 'दुर्गा' मालिकेत लीड हिरो होता. लग्नाला काही दिवस शिल्लक असतानाच मालिका संपली. आता लग्नानंतर दोघे कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. दोघांना एकत्र स्क्रीनवर पाहण्यासाठीदेखील चाहते आतुर झाले आहेत .