Video: शिवानी सुर्वे व समीर परांजपेच्या 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 13:13 IST2024-06-06T13:13:24+5:302024-06-06T13:13:54+5:30
मालिकेचा आणखी एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

Video: शिवानी सुर्वे व समीर परांजपेच्या 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित
'स्टार प्रवाह' (Star Pravah) वाहिनीवर सध्या नव्या मालिकांचं सत्र सुरु झालं आहे. लवकरच 'थोडं तुझं थोडं माझं' (Thod Tuz Ani Thod Maz) ही नवी मालिका सुरु होणार आहे. काही दिवसांपुर्वीच या मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. तो प्रोमो चाहत्यांच्या भलताच पसंतीस पडला. यानंतर सगळीकडे 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेची चर्चा रंगली आहे. यातच आता या मालिकेचा आणखी एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
'थोडं तुझं आणि थोडं माझं' या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता समीर परांजपे (Sameer Pranjape ) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शिवानी सुर्वे ही मानसी सणस ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर समीर हा तेजस प्रभू हे पात्र साकारणार आहे. समीरचं पात्र हे अत्यंत बिनधास्त तर मानसीचं पात्र हे तिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक असं दाखवण्यात आलं आहे. यासोबतच अभिनेत्री मानसी कुलकर्णी हिनं गायत्री प्रभू हे पात्र साकारलं आहे.
नव्या प्रोमोमध्ये मानसी (शिवानी) ही आपल्या आदर्श असणाऱ्या गायत्री प्रभूकडे (मानसी कुलकर्णी) प्रशस्तीपत्रावर सही घेण्यासाठी तिच्या घरी जाते. याच वेळी तिची भेट तेजसशी होते. मानसी तेजसला गायत्रीविषयी विचारते आणि प्रशस्तीपत्रावर सही पाहिजे असल्याचं सांगते. तेव्हा तेजस म्हणतो, 'कठीण आहे' आणि घरात जायला सांगतो. मानसी घरात जाते. पण गायत्री तिला पाहून चिडते आणि तिचा सगळ्यांसमोर पुन्हा अपमान करते. मानसी तशीच माघारी फिरते तेव्हा तेजस तिला थांबवतो आणि सही आणून देतो, असे म्हणतो. मग तेजस घरात जातो आणि स्वतः मानसीच्या प्रशस्तीपत्रावर गायत्रीची खोटी सही देतो. मानसीला प्रशस्तीपत्रावर गायत्रीची सही पाहून आनंद झाल्याचं प्रोमोमध्ये दिसतं. हा प्रोमो सध्या सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिका येत्या 17 जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान ही मालिका रात्री 9 वाजता प्रदर्शित होणार आहे. शिवानी व समीर पहिल्यांदाच या मालिकेतून एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे मानसी आणि तेजसच्या प्रेमाचा प्रवास देखील या मालिकेतून पाहता येणार आहे. या नव्या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.