'कोणाच्याही जाण्यामुळे शो थांबणार नाही'; शैलेश लोढांनी मालिका सोडल्यामुळे असित मोदी नाराज?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 02:05 PM2022-08-07T14:05:08+5:302022-08-07T14:05:17+5:30
Asit modi: अलिकडेच असित मोदी यांनी या मालिकेविषयी आणि शैलेश लोढा यांच्याविषयी भाष्य केलं आहे.
गेल्या १४ वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (taarak mehta ka ooltah chashmah) या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. या १४ वर्षांच्या काळात या शोमध्ये अनेक बदल झाले. काही नव्या कलाकारांची एन्ट्री झाली. तर काही लोकप्रिय कलाकारांनी हा शो सोडला. यात अलिकडेच 'तारक मेहता' ही भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा (shailesh lodha) यांनी या मालिकेला रामराम केला आहे. त्यामुळे ही मालिका पुन्हा नव्याने चर्चिली जात आहे. यातच आता शैलेश लोढाच्या मालिका सोडण्याविषयी मालिकेच्या निर्मात्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
अलिकडेच असित मोदी (asit modi) यांनी या मालिकेविषयी आणि शैलेश लोढा यांच्याविषयी भाष्य केलं आहे. शैलेश लोढा यांनी एका नव्या कार्यक्रमासाठी तारक मेहताला रामराम केल्यामुळे असित मोदी नाराज झाले आहेत. त्यांची ही नाराजी त्यांनी व्यक्तही करुन दाखवली आहे.
"मी यापूर्वीही एकदा सांगून झालंय, मी कायम सगळ्यांना जोडून ठेवायचा प्रयत्न करतो. पण, जर एखाद्याला सोबत राहायचं नसेल आणि त्यांना वाटत असेल की त्यांचं पोट भरलंय किंवा त्यांनी खूप काही काम केलंय . पण, आता काही नवं करायचंय तर त्यांनी फक्त तारक मेहतापर्यंत मर्यादित राहू नये", असं असित मोदी म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "जर कोणाला हे समजत नसेल तर मला त्यांना एकच सांगायचंय आधी नीट विचार करा, समजून घ्या. कोणाच्याही जाण्यामुळे शो थांबणार नाही. शो सुरुच राहिल. जुने तारक मेहता आला तरी आनंद आहे आणि नवीन आले तरी आनंदच आहे. प्रेक्षकांना आनंदी ठेवणं हेच माझं मूळ उद्दिष्ट्य आहे."
दरम्यान, शैलेश लोढापूर्वी अनेक दिग्गज कलाकारांनी या शोकडे पाठ फिरवली आहे. यापूर्वी टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज अनादकटने ही मालिका सोडली. तसंच सोनू, अंजली भाभी, दया भाभी या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनीही या मालिकेकडे पाठ फिरवली आहे.