'जातीवरुन अस्तित्वाचा माज का करावा?', अक्षय भालेराव प्रकरणावर श्रमेश बेटकरची डोळ्यात अंजन घालणारी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 02:03 PM2023-06-06T14:03:34+5:302023-06-06T14:04:18+5:30

Maharashtrachi Hasyajatra Fame Shramesh Betkar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता श्रमेश बेटकर याने जातीय द्वेष करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

Shramesh Betkar's eye-opening reaction to the Akshay Bhalerao case, 'Why should caste be the basis of existence?' | 'जातीवरुन अस्तित्वाचा माज का करावा?', अक्षय भालेराव प्रकरणावर श्रमेश बेटकरची डोळ्यात अंजन घालणारी प्रतिक्रिया

'जातीवरुन अस्तित्वाचा माज का करावा?', अक्षय भालेराव प्रकरणावर श्रमेश बेटकरची डोळ्यात अंजन घालणारी प्रतिक्रिया

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो महाराष्ट्राची हास्यजत्रा(Maharshtrachi Hasyajatra)ने प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवले आहे. या शोमधून अनेकदा सामाजिक विषयावर भाष्य केले जाते. तसेच या शोमधील विनोदवीर सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून ते समाजात घडणाऱ्या घटनांवर आपले मत व्यक्त करत असतात. दरम्यान आता या शोमधील अभिनेता श्रमेश बेटकर (Shramesh Betkar) याने जातीय द्वेष करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे. 

श्रमेश बेटकर याने फेसबुकवर जात मानणाऱ्या प्रत्येकासाठी, जातीय द्वेष करणाऱ्या प्रत्येकासाठी म्हणत लिहिले की, अक्षय भालेराव असू दे किंवा जातीय द्वेषातून कुणाही व्यक्तीची हत्या झाल्यानंतर, जात जिंकली असं वाटणाऱ्या लोकांनी कृपया इकडे लक्ष द्या . मेंदू अजून अश्मयुगातली गुहा साफ करत असला तरी आता आपण कॅलेंडर नुसार २१व्या शतकात आलो आहोत. बरं आपला जन्म आई वडिलांच्या कृपेने झाला त्यामुळे त्यात आपलं काही कर्तृत्व नाही, जो ऑक्सिजन आपण घेतोय तो आपण बनवलेला नाही . कोपऱ्यातल्या भिंतीवर सुसु करण्यात, रस्त्यावर थुंकण्यात, आई बहिणी वरून शिव्या देण्यात, आणि मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आपलं अर्ध आयुष्य जातं.  सुई नेलकटर पासून ते अगदी फॅन, एसी, फ्रिज, कार, मोटार, बाईक, विमान, वाशिंग मशीन, एवढंच काय ज्ञानांचं  नवीन मशीन झालेला मोबाइल सुद्धा आपण बनवलेला नाही. मग दुसऱ्याने बनवलेल्या  सुईच्या भोकात फक्त दोरा घालण्याची आपली पात्रता असताना आपण आपल्या अस्तित्वाचा माज का करावा ? ते पण जातीवरून ?. 


त्याने पुढे म्हटले की, जात जर एवढी पावरफुल आहे मग भूक लागली की आपण चपाती बरोबर जात का खात नाही ? गाडीत पेट्रोल ऐवजी जात का टाकत नाही ? का आपल्या पात्रतेची धाव कुंपणापर्यंतच  आहे कळण्याची भीती वाटते ? कोरोना झाल्यावर लसी ऐवजी आपण जात का टोचली नाही ? एका मायक्रो मॅकरो साईज विषाणूने  आपली पळता भुई थोडी केली होती , अस्पृश्य केलं होतं आपल्याला तरीही आपला माज अजून उतरला नाही . बरं अडी नडीला  ही जात बँकेत ठेवली तर लोन पण मिळणार नाही म्हणजे किंमत शून्यच नाही का ? पण आपल्याला हे समजू शकत नाही कारण उत्क्रांती नावाची अवदसा आपल्याला शिवली नाही. 

उम्मीद पे दुनिया कायम है...
कुत्रा कुत्रा म्हणून जन्माला येतो आणि तो कुत्रा म्हणून जगतो , साप साप म्हणून जगतो, पक्षी पक्षी म्हणून जगतात, सगळेजणं आप आपला रोल नीट निभावत असताना आपण का माती खातो ?.  माणूस म्हणून जन्माला आलो माणूस म्हणून जगायचंय.. सोप्प आहे. प्रयत्न करायचा आहे. थोडं कठीण जाईल कारण पुस्तकांशी, तत्वाशी, सात्विक विचारांशी असा संबंध येत नाही पण ठीक आहे उम्मीद पे दुनिया कायम है, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

Web Title: Shramesh Betkar's eye-opening reaction to the Akshay Bhalerao case, 'Why should caste be the basis of existence?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.