"तो काहीतरी गिफ्ट घेऊन यायचा आणि गळाच धरायचा...", श्रेया बुगडेने सांगितला 'तू तिथे मी'चा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 04:15 PM2024-07-25T16:15:15+5:302024-07-25T16:15:46+5:30
'तू तिथे मी' या मालिकेत श्रेया दिसली होती. या मालिकेत तिने सोशिक पत्नी असलेल्या स्त्रीची भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रेयाने या भूमिकेबद्दल सांगितलं.
मराठी सिनेसृष्टीची कॉमेडी क्वीन अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. 'चला हवा येऊ द्या' या शोमुळे श्रेया घराघरात पोहोचली. श्रेयाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, चला हवा येऊ द्यामुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सध्या ती 'ड्रामा ज्युनियर्स' या रिएलिटी शोचं सूत्रसंचालन करत आहे. झी मराठी वाहिनीवरील 'तू तिथे मी' या मालिकेत श्रेया दिसली होती. या मालिकेत तिने सोशिक पत्नी असलेल्या स्त्रीची भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रेयाने या भूमिकेबद्दल सांगितलं.
श्रेयाने नुकतीच आपली सोसल वाहिनी या युट्यूब चॅनेलला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या. श्रेयाला या मुलाखतीत तिने साकारलेल्या भूमिकांपैकी आवडतं कॅरेक्टर कोणतं? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना तिने तू तिथे मी मालिकेतील मंजिरी होळकर या भूमिकेचा अनुभव शेअर केला. श्रेया म्हणाली, "चला हवा येऊ द्या मध्येच मी २००-३०० कॅरेक्टर केले. पण, तू तिथे मी मालिकेत मी साकारलेली भूमिका माझ्या सर्वात जवळची आहे. मिलिंदे शिंदे आणि माझी जोडी होती. एक त्रासलेली, ग्रासलेली बायको अशी भूमिका मी साकारलेली होती. जिला एपिसोडमध्ये फार कमी वाक्य असायची".
"एक कलाकार म्हणून खूप काही करू शकतो असा तो रोल होता. ती भूमिका करताना मला एक वेगळी मजा आली होती. कारण, मिलिंद दादासारखा अभिनेता समोर होता. त्याच्याबरोबर मॅच होणं, केमिस्ट्री दिसणं...तो एक सटक डोक्याचा माणूस असलेला व्हिलन होता. आणि त्याच्याबरोबर सीन्स करायचे होते. तो काहीतरी गिफ्ट घेऊन यायचा आणि गळाच धरायचा. मला या भूमिकेत इतक्या संधी मिळायच्या...मंजूषा होळकर असं त्या भूमिकेचं नाव होतं. तू तिथे मी ला इतकी वर्ष झाली. तरी माझ्या जवळचं ते कॅरेक्टर आहे," असंही श्रेयाने सांगितलं.