'माझी तुझी रेशीमगाठ' पुन्हा टीव्हीवर परतणार? श्रेयस म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 15:20 IST2024-02-28T15:06:35+5:302024-02-28T15:20:42+5:30
झी मराठी वाहिनीवरील या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं.

'माझी तुझी रेशीमगाठ' पुन्हा टीव्हीवर परतणार? श्रेयस म्हणाला...
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. या मालिकेतील यश-नेहाच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. तर परीच्या क्यूटनेसची प्रेक्षकांना भूरळ पडली. काही कारणास्तव मालिकेने फार कमी कालावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली होती. अनेकदा या मालिकेचा दुसरा सीझन येणार असल्याच्या चर्चा होतात. आता पुन्हा एकदा मालिकेचा दुसरा सीझन सुरू होणार असल्याच्या सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याला कारण ठरलाय श्रेयस तळपदे.
नुकतेच श्रेयस तळपदेने लोकमत फिल्मीला खास मुलाखत दिली. यावेळी त्याने 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेवर भाष्य केलं. तो म्हणाला, 'मालिकेचा सेट मी खूप मीस करतो. पार्थना, संकर्षन आणि मायरा या सर्वांची मला आठवण येते. आमच्या खूप छान बॉन्डिंग झालं. आम्ही सेटवर आनंदी असायचो आणि तेच स्क्रिनवर दिसायचे. ते प्रेक्षकांना आवडत होतं. पण, चॅनलने मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. पण, जर पुन्हा ही सगळी टीम एकत्र येऊन काम करु शकलो तर मला ते खूप आवडले'. श्रेयसने 'माझी तुझी रेशीमगाठ'च्या कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याने आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
'माझी तुझी रेशीमगाठ' प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. मात्र ही मालिका बंद करत तिच्याजागी दुसरी मालिका लावण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव मालिका बंद न करता ६. ३० वाजता सुरू करण्यात आली. मात्र लो टीआरपीमुले मालिका अखेर बंद करण्यात आली. या मालिकेत श्रेयस तळपदे सोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत होती. यापूर्वीही श्रेयसने 'आभाळमाया' आणि 'अवंतिका' तसेच दूरदर्शनवरील 'दामिनी' या गाजलेल्या मराठी मालिकांमध्येही काम केले आहे. छोट्या पडद्यावरून श्रेयसने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती.