श्रीमान श्रीमतीमधील चिंटू आता दिसतो असा, त्याला ओळखणे देखील होतंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 08:00 AM2020-04-29T08:00:00+5:302020-04-29T08:00:02+5:30
अजयचा लूक आता पूर्णपणे बदलला असून तो एकदम फिट दिसत आहे.
श्रीमान श्रीमती ही मालिका नव्वदीच्या दशकात चांगलीच गाजली होती. या मालिकेतील केशव कुलकर्णी, त्याची पत्नी कोकी, दिलरुबा, प्रेमाशालिनी, चिंटू या व्यक्तिरेखा आजही आपल्या लक्षात आहेत. या मालिकेला प्रेक्षकांनी एकेकाळी डोक्यावर घेतले होते. सध्या भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे कोणत्याही मालिका अथवा चित्रपटांचे चित्रीकरण सध्या होत नाहीये. प्रेक्षकांना दूरदर्शन या वाहिनीवर सध्या रामायण, महाभारत अशा जुन्या मालिका पाहायला मिळत आहेत. या मालिकांप्रमाणे प्रेक्षकांची आवडती मालिका श्रीमान श्रीमती देखील पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
श्रीमान श्रीमती या मालिकेचे दिग्दर्शन राजन वाघधर यांनी केले होते. या मालिकेत जतिन कनकिया, रिमा लागू, राकेश बेदी, अर्चना पुरणसिंग, अजय नागरथ मुख्य भूमिकेत होते. केशव आणि कोकीच्या मुलाच्या म्हणजेच चिंटूच्या भूमिकेत अजय दिसला होता. या मालिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेच्यावेळी अजय केवळ आठ वर्षाचा होता. नंतर तो फॅमिली नं १, शाका लाका बूम बूम या मालिकांमध्ये तर परदेस, ये है जलवा यांसारख्या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत दिसला. त्याचे लहानपणी वजन हे खूपच जास्त होते. पण त्याने बिगेस्ट लूजर जितेगा या शोमध्ये भाग घेत काही वर्षांपूर्वी त्याचे कित्येक किलो वजन कमी केले होते. तो काही वर्षांपूर्वा सीआयडी या मालिकेत देखील दिसला होता. तसेच शाहरुख खानच्या जब हॅरी मेट सेजल या चित्रपटात देखील त्याने काम केले होते. सध्या अजय अभिनयक्षेत्रात कार्यरत नसला तरी सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो.
अजयचा लूक आता पूर्णपणे बदलला असून तो एकदम फिट दिसत आहे. त्याचे सध्याचे फोटो पाहिले तर त्याला ओळखणे देखील कठीण जाते.