Good News! श्रीयुत गंगाधर टिपरे पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस, या वेळात पाहाता येणार मालिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 07:34 PM2020-06-08T19:34:16+5:302020-06-08T19:39:39+5:30
प्रेक्षकांना श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका पुन्हा पाहायला मिळणार आहे. या मालिकेत दिलीप प्रभावळकर यांनी श्रीयुत गंगाधर टिपरे ही मुख्य भूमिका साकारली होती.
सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने कोणत्याच मालिकेचे अथवा चित्रपटाचे चित्रीकरण होत नाहीये. त्यामुळे छोट्या पडद्यावर गाजलेल्या जुन्या मालिका पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. झी मराठी वाहिनीवरील अनेक जुन्या मालिका पुन्हा प्रक्षेपित केल्या जात असून प्रेक्षक या मालिका अतिशय आनंदाने पाहात आहेत. प्रेक्षकांची एक आवडती जुनी मालिका आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेने एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. ही मालिका २००१ ते २००५ च्या दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना त्यांची ही आवडती मालिका पाहायला मिळणार आहे. या मालिकेत दिलीप प्रभावळकर यांनी श्रीयुत गंगाधर टिपरे ही मुख्य भूमिका साकारली होती तर राजन भिसे आणि शुभांगी गोखले हे त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या भूमिकेत दिसले होते तर विकास कदमने त्यांच्या नातवाची म्हणजेच शिऱ्याची तर रेश्मा नाईकने त्यांच्या नातीची म्हणजेच शलाकाची भूमिका साकारली होती. आज इतकी वर्षं झाली असली तरी या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. ही मालिका आता १५ जून पासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांना झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
दिलीप प्रभावळकर यांनी श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेत साकारलेली आबा टिपरे या भूमिकेने तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. एक आदर्श एकत्र कुटुंब नेमकं कसं असावं हे या मालिकेतून उत्तमरित्या मांडण्यात आलं होतं. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यामुळे आता ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर या मालिकेचे फॅन्स खूश होणार यात काहीच शंका नाही.