श्वेता तिवारीची मुलगी पलकने अभिनव प्रकरणात केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 03:15 PM2019-08-13T15:15:07+5:302019-08-13T15:20:28+5:30
श्वेता तिवारीचे हे प्रकरण मीडियात गाजत असताना आता तिची मुलगी पलकने इन्स्टाग्रामवर याबाबत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे.
कसौटी जिंदगी की या मालिकेत साकारलेल्या प्रेरणाच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारीने पती अभिनव कोहलीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. श्वेताने दिलेल्या तक्रारीनुसार, अभिनवने तिची मुलगी पलक हिलाही मारहाण केली. यानंतर मायलेकींनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली होती.
हे प्रकरण मीडियात गाजत असताना आता श्वेताची मुलगी पलकने इन्स्टाग्रामवर याबाबत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. तिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, या सगळ्या प्रकरणात मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद... या प्रकरणात अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या आहेत. या घटनेमागचे सत्य काय आहे हे मीडियाला माहीत नाहीये. माझी आई नव्हे तर मी अनेकवेळा घरगुती हिंसाचाराला बळी पडले आहे. आम्ही ज्या दिवशी तक्रार नोंदवायला गेलो, केवळ त्याच दिवशी माझ्या आईवर हात उचलला गेला होता. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर लिहिताना अनेकवेळा विचार करूनच त्याबाबत लिहावे. कारण कोणातीही प्रतिमा मलीन करण्याचा कोणालाही अधिकार नाहीये. माझी आई प्रचंड कणखर असून ती या प्रकरणात देखील खंबीरपणे उभी आहे. तिचा आजवर सगळा स्ट्रगल पाहाणारी मी एकमेव व्यक्ती आहे.
या पोस्टमध्ये पलकने पुढे लिहिले आहे की, अभिनव कोहलीने कधीही मला कोणत्याही पद्धतीने चुकीचा स्पर्श केलेला नाहीये. त्यामुळे कोणत्याही अफवा पसरवू नका... माझ्यावर आणि आईवर नेहमीच वाईट टिपण्णी करण्यात आलेली आहे. आमच्यासाठी कोणते शब्द वापरण्यात आले हे ऐकल्यावर कोणत्याही महिलेला राग येईल. हे आमचे खाजगी प्रकरण असून यावर कमेंट करण्याचा कोणालाही अधिकार नाहीये. माझी आई माझ्यासाठी सर्वस्व असून तिने आजवर सगळ्या जबाबदाऱ्या लीलया पेलल्या आहेत. तिला कोणत्याही पुरुषाच्या पाठिंब्याची गरज नाहीये.
श्वेता तिवारीचे हे दुसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न राजा चौधरीसोबत झाले होते. त्याने दाल में कुछ काला है या चित्रपटात काम केले होते. तसेच तो अदालत, तेनाली रामा, कहानी चंद्रकांता की यांसारख्या कार्यक्रमात झळकला आहे. बिग बॉस या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये तो दिसला होता. या कार्यक्रमामुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.