सिद्धार्थ जाधवचा 'आता होऊ दे धिंगाणा', झळकणार छोट्या पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 16:52 IST2022-08-25T16:52:32+5:302022-08-25T16:52:59+5:30
Siddharth Jadhav : सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

सिद्धार्थ जाधवचा 'आता होऊ दे धिंगाणा', झळकणार छोट्या पडद्यावर
दर्जेदार मालिका आणि नवनव्या रिऍलिटी शोजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी स्टार प्रवाह वाहिनी १० सप्टेंबरपासून भेटीला घेऊन येतेय असाच एक भन्नाट कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’ (Aata Hou De Dhingana). नावाप्रमाणे हा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाचा धिंगाणा असणार आहे. स्टार प्रवाह परिवारातल्या दोन मालिकांच्या टीममध्ये ही अनोखी सांगितीक लढत रंगणार आहे. पण हा नुसता म्युझिकल कार्यक्रम नाही. तर बरेच भन्नाट टास्क आणि कलाकारांच्या पडद्यामागच्या गमती जमती या मंचावर उलगडतील. सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.
सिद्धार्थ जाधव तब्बल ११ वर्षांनंतर तो स्टार प्रवाहसोबत पुन्हा जोडला जातोय. या कार्यक्रमासाठी तो अतिशय उत्सुक असून अशा पद्धतीच्या कार्यक्रमाची मी वाट पहात होतो असे सिद्धार्थ म्हणाला. या कार्यक्रमात म्युझिक आहे, मस्ती आहे आणि एक वेगळा धिंगाणा आहे. प्रेक्षकांचं वेगवेगळ्या पद्धतीने मनोरंजन करायला मला आवडतं. आता होऊ दे धिंगाणा हा कार्यक्रम म्हणजे फक्त गाण्याचा कार्यक्रम नाही तर यातल्या काही गोष्टी प्रेक्षकांना नवं सरप्राईज देतील. प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की आपली छाप पाडणारा एक कार्यक्रम असावा. हा कार्यक्रम त्याच धाटणीचा आहे. या कार्यक्रमात सहभागी होणारा प्रवाह परिवार या शोला वेगळ्या उंचीवर नेतो. या सगळ्यांकडून नवी ऊर्जा मिळते. स्टार प्रवाह वाहिनीला फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर जगभरातून प्रेम मिळत आहे. या कुटुंबाचा भाग होताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतोय.
त्यामुळे सिद्धार्थ जाधवची एनर्जी आणि प्रवाह परिवाराचा धिंगाणा एकत्र अनुभवायचा असेल तर होऊ दे धिंगाणा हा कार्यक्रम पाहायलाचा हवा. हा अनोखा आणि भन्नाट कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’ १० सप्टेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.