इश्कबाज मालिकेद्वारे सिद्धी कारखानीसने केला हिंदी मालिकेत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 02:03 PM2018-07-06T14:03:23+5:302018-07-07T07:00:00+5:30
लव्ह लग्न लोचा, देवयानी यांसारख्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारलेली सिद्धी कारखानीस आता इश्कबाज या हिंदी मालिकेत एका महत्त्वाची भूमिका साकारते आहे.
सिद्धी कारखानीसने माझा होशील का या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेत तिने ऋतुजा सरपोतदार ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती देवयानी या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. नुकतीच ती झी युवावरील लव्ह लग्न लोचा या मालिकेत शाल्मली या भूमिकेत प्रेक्षकांना दिसली होती. तिची ही मालिका संपल्यानंतर सिद्धी आता कोणत्या मालिकेत काम करणार याची उत्सुकता तिच्या फॅन्सना लागली होती.
सिद्धी सध्या प्रेक्षकांना इश्कबाज या मालिकेत दिसत असून या मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या मालिकेतील तिचा लूक हा खूपच छान आहे. या भूमिकेविषयी सिद्धी सांगते, मला हिंदीत काम करण्याची सुरुवातीपासून इच्छा होती. त्यामुळे मी हिंदीसाठी अनेक वर्षांपासून ऑडिशन देत आहे. इश्कबाज या मालिकेसाठी मी ऑडिशन दिले होते. या मालिकेत काम करण्याची मला संधी मिळाल्यामुळे मी खूपच खुश आहे. लव्ह लग्न लोचा या मालिकेतील शाल्मली ही अतिशय बबली, चुलबुली मुलगी होती. पण इश्कबाज या मालिकेतील माझी व्यक्तिरेखा ही पूर्णपणे वेगळी आहे. ही भूमिका साकारायला खूपच मजा येत आहे. मी मराठी असल्याने हिंदीत संवाद बोलणे हे माझ्यासाठी तितकेसे सोपे नाहीये. त्यामुळे सध्या यावर मी प्रचंड मेहनत घेत आहे. हिंदी बोलताना मी मराठी असल्याचे जाणवू नये याची मी चांगलीच काळजी घेत आहे. सध्या मी माझ्या घरातल्यांशी देखील हिंदीतच बोलत आहे. मी घेत असलेल्या मेहनतीचा मला फायदा देखील होत आहे. कारण माझी एंट्री होऊन काहीच दिवस झाले असले तरी प्रेक्षकांचा खूपच छान प्रतिसाद माझ्या भूमिकेला मिळत आहे. मला नेहमीच आव्हानात्मक भूमिका साकारायला आवडतात. कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून काहीतरी आव्हानात्मक करण्याकडे माझा नेहमीच कल असतो. वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मला आवडतात. ही मालिका अशीच माझ्या कम्फर्ट झोनला चॅलेंज करणारे असल्याने काम करताना मजा येतेय. या मालिकेत मी ऑबेरॉय कुटुंबातील तीन भावांची एकुलती एक बहीण दाखवली आहे. मालिकेतील माझे सगळेच सहकलाकार खूपच चांगले आहेत. आणि मी हिंदीत काम करत असली तरी माझ्या मातृभाषेत काम करण्याची ओढ ही कायमच असणार आहे. त्यामुळे मराठीत काम करण्यास मी नेहमीच उत्सुक आहे.