Smriti Irani : स्मृती इराणींनी ४० वर्षांपासून खाल्ली नाही आवडीची काळी डाळ, कारण ऐकून डोळे पाणावतील...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 05:14 PM2023-03-30T17:14:10+5:302023-03-30T17:15:57+5:30
Smriti Irani : ४० वर्षांनंतर आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत बोलल्या स्मृती इराणी, वाचा काय म्हणाल्या?
Smriti Irani Parents Divorce : 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेमुळे स्मृती इराणी या प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. मालिकेत त्यांनी साकारलेली तुलसीची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आता त्या देशाच्या महिला व बालविकास मंत्री आहेत. स्मृती आपल्या खासगी आयुष्याबद्दल कधीच बोलल्या नाहीत. मात्र पहिल्यांदा आयुष्यातील अनेक कटू आठवणींबद्दल त्या व्यक्त झाल्या. निलेश मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं. आईवडिलांच्या घटस्फोटाबद्दल त्या बोलल्या.
काय म्हणाल्या स्मृती इराणी...?
स्मृती ७ वर्षांच्या असताना त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. आई-वडिलांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. पण पुढे दोघांत मतभेद निर्माण झालेत आणि त्यांचं नातं घटस्फोटापर्यंत आलं. याबद्दल स्मृती म्हणाल्या, “माझं पहिलं घर गुडगावमध्ये होतं. आजही मला ते आठवतं. घरात झाडू मारायचं, स्वच्छतेचं काम माझ्याकडे होतं. त्या घराचा फक्त एक फोटो माझ्याकडे आहे. या घराची अखेरची आठवण मी ७ वर्षांची असतानाची आहे. १९८३ साली एकेदिवशी मी आणि माझ्या बहिणी आम्ही काळी डाळ (उडदाची काळी डाळ) खात होतो. मग अचानक एखाद्या फिल्मी सीनसारखी माझी आई आली आणि तिने रिक्षा थांबवली. तिने सामान आवरायला घेतलं. लवकर जेवण आटपा, आपण दिल्लीला निघणार आहोत, असं ती आम्हाला म्हणाली. तो एक दिवस आणि आजचा दिवस... त्यानंतर मी काळी डाळ कधीच खाल्ली नाही. खरं तर काळी डाळ माझ्या खूपआवडीची होती.
माझी आई बंगाली ब्राह्मण होती आणि वडील पंजाबी खत्री होते. त्यांनी घरच्यांच्या विरोधात लग्न केलं. माझ्या आई-वडिलांनी जेव्हा लग्न केलं तेव्हा त्यांच्याजवळ फक्त १५० रुपये होते. लेडी हार्टिंग्स रुग्णालयामध्ये माझा जन्म झाला. गुडगांवमध्ये आम्ही स्थायिक झालो. कारण तिथे राहणं आम्हाला परवडण्यासारखं होतं. माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे हे सांगण्यासाठी मला ४० वर्ष लागली. जेव्हा माझे आई-वडील एकमेकांपासून विभक्त झाले तेव्हा लोक आमचा द्वेष करत होते. १०० रुपयांमध्ये घर खर्च चालवणं, आम्हाला सगळ्यांना सांभाळणं किती कठीण होतं हे आता मला समजत आहे. माझे वडील आर्मी क्लबच्या बाहेर पुस्तकं विकायचे. तेव्हा मी त्यांच्याजवळ बसायचे. माझी आई घरोघरी वेगवेगळे मसाले विकायची. माझ्या वडिलांनी शिक्षण घेतलं नव्हतं. पण आई पदवीधर होती. शैक्षणिक फरक हा माझ्या आई-वडिलांमधील एक वादाचा विषय होता.., असं स्मृती म्हणाल्या.