"...तर तुम्ही एक नंबरचे मूर्ख, मुर्दाड आणि आत्मघातकी आहात", मराठा आंदोलनावर किरण मानेंची खरमरीत पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 10:47 AM2023-11-02T10:47:15+5:302023-11-02T10:47:50+5:30
Kiran Mane : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता किरण मानेंनीदेखील मराठा आंदोलनासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मनोज जरांगे सध्या आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. याच कारणामुळे राज्यात जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे लोक उपोषणाला बसले आहेत. काही ठिकाणी जाळपोळीच्याही घटनादेखील घडल्या आहेत. या आंदोलनाला बऱ्याच कलाकार मंडळींनी समर्थन दर्शवले आहे. दरम्यान आता मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता किरण मानें(Kiran Mane)नीदेखील मराठा आंदोलनासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
किरण माने यांनी फेसबुकवर लिहिले की, विरोधात साधी पोस्ट केली तरी अकाऊंट रिस्ट्रीक्ट होतं. जाब विचारणार्या पत्रकारांच्या नोकर्या जातात. कलाकारांना बायकाॅट केलं जातं. अशा दडपशाहीच्या काळात, संविधानिक मार्गाने एक आंदोलन होतंय आणि त्याने सत्ताधार्यांना हलवून सोडलंय... हे खूप आशादायी आहे, एवढं जरी तुम्हाला कळत नसेल. तुम्ही मराठा आंदोलनावर जहरी टीका करुन फॅसीस्ट शक्तींना बळ देत असाल तर तुम्ही एक नंबरचे मूर्ख, मुर्दाड आणि आत्मघातकी आहात.
जाळीपोळीच्या घटनेवरदेखील किरण मानेंनी पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी म्हटले की, ''शत्रू कावेबाज असताना कशावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणं घातक ठरू शकतं. जाळपोळ करणारे नक्की कोण आहेत? ते ठराविक ठिकाणीच हिंसा करत असतील तर त्यामागे काय हेतू असू शकतो? यामागचा कारण-कार्य-संबंध जाणून घ्यायला हवा. पिसाळलेला हत्ती दिसेल ते उद्ध्वस्त करतो. ठरवून विशिष्ट ठिकाणी जाऊन तोडफोट करत नाही. सावध राहून शत्रूची चाल ओळखा.''