मेरे साईच्या चित्रीकरणाच्या दरम्यान घडले असे काही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:11 PM2018-08-08T17:11:22+5:302018-08-09T08:00:00+5:30
मेरे साई या मालिकेत नवीन व्यक्तिरेखा दाखल झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. अलीकडेच या मालिकेत तुळसाच्या रूपात दाखल झालेल्या स्नेहा वाघ सोबत चित्रीकरण करताना एक गंमतीशीर प्रसंग घडला.
आपल्या आयुष्यात कधीतरी असे घडलेले असते की, आपण आपल्या कामात इतके गढून गेलेलो असतो की आपल्याला आसपासच्या सर्व गोष्टींचा विसर पडतो. अलीकडेच सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई मालिकेच्या सेटवर असाच एक प्रसंग घडला. साई बाबांच्या जीवन चरित्राच्या सुंदर सादरीकरणाबद्दल जगभरातील प्रेक्षक मेरे साई या मालिकेचे कौतुक करत आहेत आणि आता या मालिकेत नवीन व्यक्तिरेखा दाखल झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. अलीकडेच या मालिकेत तुळसाच्या रूपात दाखल झालेल्या स्नेहा वाघ सोबत चित्रीकरण करताना एक गंमतीशीर प्रसंग घडला.
मेरे साईच्या एका दृश्यात स्नेहाला अबीर म्हणजे साई बाबांचे पाय दगडाने घासायचे होते. अबीरला लागू नये याची काळजी आणि भीती मनात असल्याने स्नेहा काळजीपूर्वक काम करत होती. दिग्दर्शकाला हे दृश्य वेगळ्या प्रकारे साकारायचे होते आणि त्याने स्नेहाला दृश्य नैसर्गिक वाटेल अशा रीतीने सादर करण्याची विनंती केली. स्नेहा तुळसाच्या व्यक्तिरेखेशी इतकी जोडली गेली होती की, तिने अबीरचे पाय जोरजोरात इतके घासले की, पाय गडद लाल झाले. दिग्दर्शकाने पुन्हा पुन्हा थांबण्यास सांगून देखील ती तिच्या व्यक्तिरेखेत इतकी मग्न झाली होती की, तिचे लक्षच नव्हते त्यामुळे ती थांबली नाही. अबीरने खेळकरपणे हा प्रसंग स्वीकारला आणि तिच्या कामाबद्दलच्या निष्ठेबद्दल तिचे कौतुक केले. याबाबत स्नेहा वाघला विचारले असता तिने या गोष्टीला पुष्टी देत ती म्हणाली, “चित्रीकरणासाठी आम्ही खराखुरा दगड वापरत असल्यामुळे मी अधिक सावधानतेने काम करत होते. दिग्दर्शकाने मला नैसर्गिक अभिनयसाठी प्रोत्साहित केल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि मी अधिक उत्साहाने अभिनय केला. मला अबीरबद्दल मनापासून वाईट वाटते आहे. पण तो एक प्रोफेशनल कलाकार असल्याने त्याने हा प्रसंग खिलाडू वृत्तीने घेतला आणि माझ्या प्रयत्नांबद्दल माझे कौतुक देखील केले. तुम्हाला सतत अधिक चांगले काम देण्यासाठी उद्युक्त करणार्या कलाकारांसोबत काम करायला मजा येते.”