सोनू भाभीची व्यक्तिरेखा माझ्यापेक्षा अगदी वेगळी - मोहिता श्रीवास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 07:15 AM2019-02-22T07:15:00+5:302019-02-22T07:15:00+5:30
सोनी सब वाहिनीवर बावले उतावले ही नवी मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेत्री मोहिता श्रीवास्तव सोनू भाभीची भूमिका साकारीत आहे.
सोनी सब वाहिनीवर बावले उतावले ही नवी मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेत्री मोहिता श्रीवास्तव सोनू भाभीची भूमिका साकारीत आहे. ही व्यक्तिरेखा प्रत्यक्षातील माझ्यापेक्षा अगदी वेगळी असल्याचे मोहिता सांगते.
'बावले उतावले' मालिेकेत फंटी आणि गुड्डू या दोघांच्या भन्नाट कुटुंबांची कथा पाहायला मिळणार आहे. या मालिकेबद्दल मोहिताने सांगितले की, बावले उतावले हा हलकाफुलका विनोदी कार्यक्रम आहे. यात फॅमिली ड्रामाचे सगळे घटक आहेत. लग्न केल्यानंतर माणसाच्या आयुष्यात काय घडतं याची तरुणांना उत्सुकता असते. तीच यात आहे. शिवाय, पहिले प्रेम, पहिली रात्र, आकर्षण अशा ज्या गोष्टी आपण आयुष्यात अनुभवतो त्यावरही या मालिकेत प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. प्रत्येकजणच या सगळ्या गोष्टींसाठी जरा उत्सुक, उतावीळ असतो. म्हणूनच या मालिकेचे नाव बावले उतावले आहे.
सोनू भाभी हे फार छान पात्र आहे. तिला तयार व्हायला फार आवडते आणि ती सतत तिच्या दागिन्यांसोबत व्यस्त असते. तिची बोलण्याची ढब काहीशी वेगळी आहे. त्यामुळे ती इतरांहून वेगळी भासते. तिला इंग्रजीत बोलण्याची फार आवड आहे. ही व्यक्तिरेखा प्रत्यक्षातील माझ्यापेक्षा अगदी वेगळी आहे. मला इथे काहीतरी वेगळे करायला मिळणार आहे म्हणून मी ही भूमिका स्वीकारली, असे मोहिता श्रीवास्तव सांगत होती.
चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल मोहिता म्हणाली की, सेटवर सगळ्यांबरोबरच फार धमाल येते. कॉलेजमध्ये असताना मित्रांची गँग कुठेतरी जाऊन धमाल करते, तसे वाटते. यात बरेच विनोदी सीन्स असतात त्यामुळे सेटवरचे वातावरण फार हलकेफुलके आणि उत्साही असते.