Aai Kuthe Kay Karte: पहिलं गाणं रेकॉर्ड केल्यावर काय म्हणाली अरूंधती, वाचा तिची खास मुलाखत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 04:38 PM2022-02-01T16:38:07+5:302022-02-01T16:39:38+5:30
Aai Kuthe Kay Karte : अरूंधती अर्थात मधुराणी प्रभुलकर हिने ‘लोकमत फिल्मी’ला खास मुलाखत दिली. अरूंधती बनून ती बोलली. अरूंधतीची आशुतोषसोबतची मैत्री, त्याच्याबद्दलच्या तिच्या भावना तिने यावेळी व्यक्त केल्यात.
‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte ) ही स्टार प्रवाहवरील गाजत असलेली मालिका. मालिकेतील अरूंधती, संजना, अनिरूद्ध यांच्या भोवती फिरणारी ही कथा लोकप्रिय मराठी मालिकांपैकी एक आहे. सततच्या ट्वीस्टमुळे ही मलिका चांगलीच चर्चेत आली आहे. अनिरुद्धसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरुंधतीने (Arundhati) आता तिच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलंय. होय, अरूंधतीच्या पहिल्या गाण्याचं रेकॉर्डिंग झालंय.
याच निमित्ताने अरूंधती अर्थात मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने ‘लोकमत फिल्मी’ला खास मुलाखत दिली. अरूंधती बनून ती बोलली. अरूंधतीची आशुतोषसोबतची मैत्री, त्याच्याबद्दलच्या तिच्या भावना तिने यावेळी व्यक्त केल्यात.
आशुतोष अरुंधतीचा मित्र आहे. त्याने तिला त्याच्या अल्बमध्ये गाण्याची ऑफर दिली आहे. त्यानुसार अरुंधतीच्या या गाण्याचं रेकॉर्डिंग पार पडलं.
अरूंधतीने तिच्या पहिल्या गाण्याचं रेकॉर्डिंग केलं, याबद्दल काय सांगशील असं विचारल्यावर ती म्हणाली,‘अरूंधती खूप एक्साईटेड आहे. कारण मालिकेच्या कथेसाठी हा खूप मोठा ट्विस्ट आहे. अरूंधतीने आयुष्यात खूप काय काय पाहिलं आहे. तिने तिची सगळी स्वप्न बासनात गुंडाळून ठेवली होती. एका घटनेनंतर तिला या स्वप्नांची जाणीव झाली. पण कधीतरी ती अल्बमसाठी गाणार, याचा तिने कधीच विचार केला नव्हता. तिची स्वप्नंही तिच्यापुरतीच छोटी होती. पण आता ती अल्बमसाठी गायली. हा तिच्या आयुष्यातील मोठा टर्निंग प्वॉइंट आहे. अरूंधतीच्या आयुष्यात आता पुढे काय होतं, हे पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.’
तू मालिकेत अरूंधती बनून गायली. पण अरूंधती साकारणारी मधुराणीचा आवाजही गोड आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. तेव्हा ख-या आयुष्यात अशी काही गाणी गाण्याचा इरादा आहे का? असं विचारलं असता मधुराणी गोड हसली. ‘हो... इथे आल्यावर मला प्रेरणा मिळालीये. 10-12वर्षांआधी ‘सुंदर माझं घर’ या सिनेमासाठी मी म्युझिक दिग्दर्शन केलं होतं. खूप मोठ मोठ्या गायिका माझ्यासाठी गायला होत्या. मी पण एक दोन गाणी गायली होते. आज मालिकेसाठी शूट करताना, मला पुन्हा एकदा म्युझिक कंपोझ करायला पाहिजे असं वाटू लागलंय. माझा आवाज चांगला आहे, असं एखाद्या कंपोझरला वाटलं तर नक्कीच गायला तयार आहे,’ असं मधुराणी म्हणाली.
मालिकेत अरूंधती आणि आशुतोषचं नातं एक वेगळं वळण घेईल का? असं विचारलं असता ती म्हणाली, पुढे काय होणार हे मला माहित नाही. पण अनिरूद्ध आता मनात नाही. तो आता दुखावली गेली आहे खूपच. पण आशुतोषसोबतची मैत्री अरूंधतीला आवडू लागली आहे. पण याला प्रेम म्हणायचं की काय हे तिला ठाऊक नाहीये, असं उत्तर तिने दिलं.