अभिनेत्रीला विमा कंपनीचा आला वाईट अनुभव, म्हणाली, 'मुंबई आपलं घर नाही पहिल्यांदाच जाणवलं'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 11:29 AM2023-12-10T11:29:45+5:302023-12-10T11:31:08+5:30
'हे' कारण देत सुबुहीचा रुग्णालयाचा खर्च भरण्यास विमा कंपनीने नकार दिला.
हिंदी मालिकांतील अभिनेत्री सुबुही जोशी (Subuhi Joshi) आपल्या अप्रतिम कॉमिक टायमिंगसाठी ओळखली जाते. नेहमी हसण्याखेळण्याच्या मूडमध्ये राहणाऱ्या सुबुहीची विमा कंपनीने नुकतीच फसवणूक केली आहे. तब्येत खराब झाल्याने सुबुहीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुबुहीचा रुग्णालयाचा खर्च भरण्यास विमा कंपनीने नकार दिला. याबाबत तिने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत सर्व घटना सांगितली.
सुबुही जोशीने लाईव्ह येत विमा कंपनीने केलेल्या फसवणुकीचा खुलासा केला. ती म्हणाली,'तीन दिवसांपूर्वी माझी तब्येत खराब झाली. माझे हृदयाचे ठोके खूप वाढले होते. म्हमून मी पॅनिक झाले. मला शेजारच्यांनी रुग्णालयात दाखल केले. मी आयसीयूमध्ये होते. माझा हॉस्पिटमध्ये बराच औषध-इंजेक्शन्सचा खर्च झाला.'
ती पुढे म्हणाली,'कोणत्याही सामान्य माणसाप्रमाणे मला हेल्थ इन्श्युरन्सबद्दल माहिती देण्यात आली होती आणि दर महिन्याला हेल्थ इन्श्युरन्स भरत होते. आता आलेला रुग्णालयाचा खर्च भरण्यासाठी मी हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडे अर्ज केला तर त्यांनी पैसे भरण्यास नकार दिला. मी कॅशलेस वीमा कार्डने पैसे भरणार होते. पण वीमा कंपनीने माझा फॉर्म स्वीकारला नाही. ही इमर्जन्सी केस नसल्याचं सांगत त्यांनी पैसे भरण्यास नकार दिला. रुग्णालयाने पुन्हा एक फॉर्म पाठवत हार्टबीट वाढल्याने इमर्जन्सी केस असल्याची माहिती दिली. मात्र तरी वीमा कंपनीने त्यांची सर्व्हिस देण्यापासून स्पष्ट नकार दिला.'
हे सांगताना सुबुहीला अश्रू अनावर झाले. रुग्णालायचे कर्मचारीही असभ्य असल्याचं तिने सांगितलं. बिल भरलं नसल्याने रुग्णालयाचा स्टाफ तिला चांगली वागणूक देत नव्हता. यावेळी ती एकटी असल्याने पहिल्यांदाच तिला मुंबई आपलं घर नाही आपण आपल्या कुटुंबासोबत असायला हवं होतं याची जाणीव झाली.सुबुहीने इन्स्टाग्रामवर हेल्थ इन्श्युरन्स कंपनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग करत आपली व्यथा सांगितली आहे.