बच्चेकंपनी, प्रेक्षक व परीक्षक यांच्यातील मी दुवा - स्पृहा जोशी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 06:29 PM2018-07-30T18:29:30+5:302018-07-30T18:32:03+5:30
'सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर' हा कार्यक्रम ६ ऑगस्टपासून सुरू होत आहे.
कलर्स मराठीवर 'सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर' हा कार्यक्रम ६ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या पर्वामध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यामांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री स्पृहा जोशी करणार आहे. या रिएलिटी शोचे सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाल्यामुळे स्पृहा खूप खूश असून तिने या शोच्या निमित्ताने मी बच्चेकंपनी, प्रेक्षक व परीक्षक यांच्यातील दुवा असणार असल्याचे स्पृहा म्हणाली.
कलर्स मराठीवर 'सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर'च्या या पर्वातदेखील उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे परंतु मंचावर असणार आहेत लहान मुले. ६ ते १५ वयोगटातील बच्चेकंपनी या कार्यक्रमामध्ये आपले टॅलेंट दाखविणार आहेत. नुकत्याच या कार्यक्रमाच्या ऑडिशन्स महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पार पडल्या. या छोट्या सूरवीरांचे सुरेल गाणे ऐकायला महाराष्ट्र आतूर आहे. या पर्वाचा शुभारंभ ६ ऑगस्ट रोजी होणार असून सगळ्यांचा लाडका अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे हे परीक्षक असणार आहेत.
स्पृहाने सांगितले की,'मला संगीत मनापासून आवडते आणि लहान मुलांमध्ये मी खूप रमते. 'सूर नवा ध्यास नवा'च्या या पर्वामध्ये या दोन्ही गोष्टी साधल्या जाणार आहेत. लहान मुलांना गृहीत धरून चालत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीचे नीट लॉजिक द्यावे लागते. तसेच ते थेट असतात. एखादी गोष्ट आवडली किंवा नाही हे कुठलाही आडपडदा न ठेवता सरळ सांगून टाकतात. त्यामुळे तुम्ही जसे आहात. तसेच, खरेखुरे त्यांच्यासमोर गेलात तरच त्यांच्याशी मैत्री करू शकता. बच्चेकंपनी आणि प्रेक्षक, परीक्षक यांच्यातला मी दुवा असणार आहे. त्यामुळे मी खूश आहे.'
'सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर' ६ ऑगस्टपासून रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर प्रसारीत होणार आहे.