"तीन वर्ष माझ्याकडे काम नव्हतं, मी उपाशी राहायचो आणि...", केबीसीमध्ये स्टँडअप कॉमेडियन झाकिर खानचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 12:37 PM2023-09-26T12:37:52+5:302023-09-26T12:38:37+5:30
झाकिरने 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये त्याच्या जीवनातील कठीण काळाबद्दल भाष्य केलं. स्टँडअप कॉमेडियन म्हणून प्रसिद्धी मिळण्याच्या आधीच्या काळातील संघर्षाबद्दल झाकिरने केबीसीमध्ये खुलासा केला.
'कौन बनेगा करोडपती' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. या शोचा १५वा सीझन काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या या शोमध्ये सामन्य व्यक्तींना काही प्रश्नांची उत्तरे देऊन कोट्यधीश होण्याची संधी मिळते. या शोमध्ये अनेकदा सेलिब्रिटीही हजेरी लावतात. कौन बनेगा करोडपतीच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात स्टँडअप कॉमेडियन झाकिर खानने हजेरी लावली होती.
झाकिरने 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये त्याच्या जीवनातील कठीण काळाबद्दल भाष्य केलं. अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसताच झाकीरने त्याचं लहानपणीचं स्वप्न पूर्ण झाल्याचं सांगितलं. केबीसी बघायचो, असंही झाकिर म्हणाला. स्टँडअप कॉमेडियन म्हणून प्रसिद्धी मिळण्याच्या आधीच्या काळातील संघर्षाबद्दल झाकिरने केबीसीमध्ये खुलासा केला.
तो म्हणाला, "मला वडिलांनी मोठी व्यक्ती बनण्यास सांगितलं होतं. मी दिल्लीला गेला तेव्हा माझ्या एका मित्राने मला स्टँडअप कॉमेडीबद्दल सांगितलं होतं. माझा पहिला प्रयत्न फारच वाईट होता. पुढच्या वेळेपासून येऊ नकोस, असं त्यांनी मला सांगितलं होतं. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात माझे शो चांगले होत होते. त्यानंतर मला माझ्याकडे असलेल्या या गुणांची जाणीव झाली. यातून आनंद मिळतोय, हेदेखील मला कळत होतं."
"मी तीन वर्ष दिल्लीत होतो. पण, माझ्याकडे नोकरी नव्हती. मी बेरोजगार होतो. मी नोकरी करतोय, असं मी आईवडिलांना खोटं सांगितलं होतं. त्यावेळी माझा एक जवळचा मित्र माझ्याबरोबर होता. जेवण मिळालं तर एकत्र जेवायचं नाहीतर उपाशी राहायचं, असं आम्ही ठरवलं होतं. उपाशी राहणं काय असतं, हे मला माहीत आहे. त्यामुळे मला आश्चर्य वाटत नाही. सगळं काही माझं स्वप्न आहे आणि या सगळ्या गोष्टी मला मिळू शकतात, असं मला वाटतं. मग ते सिडनी ओपेरा अथवा रॉयल अल्बर्ट हॉल असो...जिथे मी लवकरच परफॉर्म करणार आहे. मला वाटतं की मी हे सगळं मिळवू शकतो," असंही झाकिरने पुढे सांगितलं.