आता असे दिसतात 'आशिकी'मधील स्टार, लावणार आहेत द कपिल शर्मामध्ये हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 20:00 IST2020-02-03T20:00:00+5:302020-02-03T20:00:02+5:30
राहुल, दीपक आणि अनूमध्ये गेल्या 30 वर्षांत प्रचंड बदल झाला असून त्यांना ओळखणे देखील कठीण जात आहे.

आता असे दिसतात 'आशिकी'मधील स्टार, लावणार आहेत द कपिल शर्मामध्ये हजेरी
द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात द कपिल शर्मा शोमध्ये नव्वदीच्या दशकातील आशिकी या गाजलेल्या चित्रपटाची टीम हजेरी लावणार आहे.
आशिकी हा चित्रपट नव्वदीच्या दशकात चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील सगळ्याच गाण्यांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटातील गाणी आजही रसिकांच्या ओठावर रुळलेली आहेत. या चित्रपटात राहुल रॉय, अनू अग्रवाल आणि दीपक तिजोरी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 30 वर्षं नुकतेच झाले असून याच निमित्ताने या चित्रपटाची संपूर्ण टीम द कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावणार आहेत.
आशिकी या चित्रपटामुळे राहुल रॉय, अनू अग्रवाल यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटानंतर राहुल रॉयने काही चित्रपटांमध्ये काम केले तर अनू बॉलिवूडपासून दूर गेली. राहुल रॉयने इन्स्टाग्रामवर द कपिल शर्मा शोच्या चित्रीकरणाच्यावेळेचे काही फोटो पोस्ट केले असून या फोटोत आपल्याला राहुल, दीपक आणि अनूला पाहायला मिळत आहे. या तिघांमध्ये गेल्या 30 वर्षांत प्रचंड बदल झाला असून त्यांना ओळखणे देखील कठीण जात आहे.
द कपिल शर्मा शो मध्ये राहुल, दीपक आणि अनूने या कार्यक्रमाच्या टीमसोबत खूप मजा-मस्ती केली. तसेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळेसचे किस्से देखील सांगितले. तसेच राहुल रॉयने या चित्रपटातील काही गाणी देखील सादर केली. हा भाग प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.
आशिकी या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते तर या चित्रपटाची निर्माते गुलशन कुमार आणि मुकेश भट होते.