‘मुलगी झाली हो’ मालिका लवकरच घेतेय निरोप; ‘हे’ आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 06:25 PM2022-04-05T18:25:30+5:302022-04-05T18:26:24+5:30
होय, लवकरच ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या 2 मे पासून या मालिकेच्या जागी ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe) ही नवी मालिका सुरू होतेय.
स्टार प्रवाहवर ( Star Pravah) ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) ही मालिका सुरू झाली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली. मालिकेचा संवेदनशील विषय प्रेक्षकांना मनापासून भावला. मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. दीर्घकाळ ही मालिका टीआरपी चार्टवर अव्वल राहिली. पण आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. होय, लवकरच ‘मुलगी झाली हो’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या 2 मे पासून या मालिकेच्या जागी ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe) ही नवी मालिका सुरू होतेय. नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे.
दरम्यान ‘मुलगी झाली हो’ ही मालिका अचानक बंद करण्याचा निर्णय वाहिनीने का घेतला? यावर सध्या वेगळीच चर्चा रंगली आहे. टीआरपी घसरल्यामुळे निर्मात्यांनी मालिका गुंडाळल्याचं कारण दिलं जातंय. पण टीआरपी का घसरला? यावर सोशल मीडियावर भलतीच चर्चा सुरू आहे. ‘मुलगी झाली हो’ ही मालिका टीआरपी रेसमध्ये अव्वल ठरली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका वादामुळे या मालिकेचा टीआरपी घसरायला सुरूवात झाली. मालिकेत विलास पाटील भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांचा ‘एपिसोड’ तुम्हाला आठवत असेलच. हा एपिसोड चांगलाच गाजला होता. यानंतर किरण माने या मालिकेतून बाहेर पडले होते. त्याचाच फटका मालिकेला बसल्याचं मानलं जातंय. किरण माने यांनी मालिका सोडल्यामुळे मालिका गुंडाळत आहात का? असा प्रश्न युजर्स विचारत आहेत.
अशी आहे नवी मालिका
‘मुलगी झाली हो’च्या जागी ‘तुझेच मी गीत गात आहे ’ ही नवी मालिका येत आहे. या मालिकेची कथा एक लहान मुलगी आणि तिचे गाणे यावर आधारित आहे. स्टार प्लसवरील ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या हिंदी मालिकेचा ही मालिका मराठी रिमेक असणार आहे. या मालिकेत नेमके कोणकोणते कलाकार असणार, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.