कथानक लांबवल्यामुळे प्रेक्षक नाराज; स्टार प्रवाहवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 06:58 PM2023-07-25T18:58:38+5:302023-07-25T18:59:28+5:30
Tv serial: सध्या स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते, सहकुटुंब सहपरिवार आणि सुख म्हणजे नक्की काय असतं?, या मालिका तुफान लोकप्रिय ठरल्या आहेत.
छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, यातील काही मालिकांना चांगला टीआरपी मिळत नाहीये. तर, काही मालिका उगाच पाणी घालून वाढवल्या आहेत. त्यामुळे अशा मालिकांविषयी सध्या प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. इतकंच नाही तर अनेक मालिका आता बंद व्हायच्या मार्गावर आहेत. यामध्येच आता छोट्या पडद्यावर सुरुवातीला तुफान गाजलेली मालिका बंद होणार आहे.
सध्या स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते, सहकुटुंब सहपरिवार आणि सुख म्हणजे नक्की काय असतं?, या मालिका तुफान लोकप्रिय ठरल्या आहेत. मात्र, यातील सहकुटुंब सहपरिवार ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतंच या मालिकेतील शेवटच्या सीनचं चित्रीकरण पार पडलं. त्यामुळे मालिकेतील कलाकार भावूक झाले आहेत. अभिनेता सुनील बर्वे यांनी एक पोस्ट शेअर करत मालिका निरोप घेत असल्याचं सांगितलं.
काय आहे सुनील बर्वेंची पोस्ट
"ह्या कपड्यांमधून बाहेर पडणं खूप त्रासदायक होतं. ८/०२/२०२० रोजी पहिल्यांदा आणि २०/०७/२०२३ रोजी मी ते शेवटचे परिधान केले. ह्या सुर्यादादा पात्राला खूप प्रेम दिलं प्रेक्षकांनी, आणि सहकलाकारांनी! माझ्या कारकिर्दीतली अजून एक प्रिय, महत्वाची मालिका! अत्यंत जड मनाने मी ह्या पेहेरावाला निरोप दिला. पुन्हा नवं काही सुरू होईलंच, त्याच्या प्रतिक्षेत असे पर्यंत हा, गेल्या साडे तीन वर्षांचा काळ मनात घुमत राहील!! #सहकुटुंबसहपरिवार , अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
दरम्यान, २४ फेब्रुवारीला या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. या मालिकेतील एकत्र कुटुंब पद्धती प्रेक्षकांना विशेष आवडली होती. मात्र, गेल्या काही काळापासून मालिकेचं कथानक उगाचच लांबवलं जात असल्याची ओरड प्रेक्षकांमधून येत होती. त्यामुळे प्रेक्षकांनी मालिकेवर टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुरुवातीला टीआरपीमध्ये प्रथम स्थानावर असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घ्यायचा ठरवलं आहे.