अखेर प्रियाने सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य आणलं समोर; 'ठरलं तर मग' मालिकेत मोठा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 04:49 PM2024-12-04T16:49:13+5:302024-12-04T16:51:13+5:30
'ठरलं तर मग मालिकेत' नवा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे.
Tharla Tar Mag: स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. सध्या या मालिकेत सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर उघड झाल्याचा नवा प्रोमो सोशल मीडियावर समोर आला आहे. अलिकडेच या मालिकेत अर्जुन-सायली एकमेकांविषयी प्रेमात पडत असल्याचं दाखवण्यात आलंय. अर्जुन आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी लवकरच एका रेस्टॉरंटमध्ये सायलीला प्रपोज करणार आहे. परंतु नुकताच स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या प्रोमोमध्ये सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रक्ट मॅरेजचं सत्य सुभेदार कुटुंबीयांसमोर उघडकीस आल्याचं दाखवण्यात आलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून प्रिया अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रक्ट मॅरेजचे पेपर्स कसे मिळवता येतील यासाठी शर्थीने प्रयत्न करताना दिसत होती. अखेर ती यशस्वी होते आणि त्यांचं भांडफोड करते. अर्जुन आणि सायलीच्या एकमेकांच्या मनातील भावना व्यक्त केल्यानंतर हा भाग प्रसारित केला जाईल असं समजतंय.
स्टार प्रवाहने सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रोमोनुसार, सायली-अर्जुन रेस्टॉरंटमधून घरी हसतमुखाने येतात. त्यावेळी घरातील प्रत्येकजण हॉलमध्ये एकत्र जमा झालेले असतात. तेव्हा कल्पना त्यांच्या समोर येऊन त्यांना लग्नाबद्दल जाब विचारते. या प्रोमोमध्ये कल्पना अर्जुनला विचारते, "खूप प्रेम आहे ना? तुमचं एकमेकांवर? बोला ना, यावर अर्जुन-सायली एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात, हो! आहे ना प्रेम. त्यांचं हे उत्तर ऐकून कल्पना राग अनावर होतो आणि ती अर्जुनच्या कानाशिलात लगावते. त्यानंतर पुढे कल्पना म्हणते, खोटं, हे सुद्धा तुमच्या लग्नासारखंच खोटं आहे."
या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आता अर्जुन-सायलीचं नातं कोण नवं वळण घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.