Struggle story: शिक्षकांकडून उधारीवर पैसे घेत संकर्षण गाठायचा मुंबई; वडिलांना नसायचा थांगपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 11:58 AM2023-06-11T11:58:52+5:302023-06-11T12:00:45+5:30
Sankarshan karhade: कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या संकर्षणने सुरुवातीच्या काळात बराच मोठा स्ट्रगल केला आहे.
मराठी कलाविश्वातील ऑल राऊंडर अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade). उत्तम अभिनयशैली अललेला हा अभिनेता, मालिका, नाटक, रिअॅलिटी शो, कविता, लेखन असं बरंच काही एकावेळी करत असतो. विशेष म्हणजे तो प्रत्येक गोष्टीला समान न्याय देतो. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगत असते. परंतु, कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या संकर्षणने सुरुवातीच्या काळात बराच मोठा स्ट्रगल केला आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या स्ट्रगल काळातील आठवणींना उजाळा दिला आहे.
"आमच्या घराच्या वर एक शिक्षक राहात होते. सच्चिदानंद खडके. त्यांच्याकडून मी ४-५ हजार रुपये उधार घ्यायचो. बाबांकडे कसे मागणार ना पैसे? मग त्यांनी दिलेले पैसे घेऊन मी रात्री ट्रेनमध्ये बसायचो आणि रिझर्व्हेशन वगैरे काहीही न करता सलग १२ तास उभा राहून परभणी ते मुंबई प्रवास करायचो. दादरला उतरल्यानंतर मराठी ग्रंथ संग्रहालयात जायचो. तिथे १०० रुपयांमध्ये २४ तास तुम्हाला बेड मिळतो. एका हलक्या कागदावर त्यांनी लिहिलं असतं. मग तिथे गेल्यावर अंघोळ वगैरे करायचो आणि फिल्मी सिटी शोधायला निघायचो", असं संकर्षण म्हणाला.
पुढे म्हणतो, "एकदा काय झालं. मी दादरला लोकल ट्रेनमध्ये चढलो. त्यावेळी मला असं वाटलं की, अरे या रेल्वेच्या डब्यात हॅण्डल किती वर असतात बाबा, ते थोडे खाली असायला हवे होते. त्यानंतर मी गोरेगावला गेलो आणि फिल्मसिटीमध्ये शूट केलं आणि परत यायला निघालो तर ट्रेनमध्ये तेच हॅण्डल खाली होते. मी मनात विचार केला, अरे सकाळी वाटलं की हे हॅण्डल किती वर आहेत आणि आता खाली पण आले. मग कुणीतरी मला येऊन सांगितलं अहो, हा लेडीज डबा आहे तुम्ही इथे का आलात?, चला खाली उतरा. मग मी गुपचूप खाली उतरलो. सुरुवातीला मी यायचो तेव्हा असे खूप गोंधळ व्हायचे.
दरम्यान, संकर्षण मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. मालिका, नाटक यांच्यासह त्याने अनेक रिअॅलिटी शोमध्येही काम केलं आहे.