गुडन्यूज! ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील ‘देवकी’ झाली आई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 10:21 AM2022-05-11T10:21:09+5:302022-05-11T10:28:21+5:30
Sukh Mhanje Nakki Kay Asta : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेतील देवकी अर्थात ही भूमिका साकारणारी मीनाक्षी राठोड कधी एकदा गोड बातमी देते, याची चाहते प्रतीक्षा करत होते. अखेर मीनाक्षीनं गोड बातमी दिली आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या लोकप्रिय मालिकेतील देवकी अर्थात ही भूमिका साकारणारी मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) कधी एकदा गोड बातमी देते, याची चाहते प्रतीक्षा करत होते. कारण, तिचे बेबी बम्पसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. अखेर मीनाक्षीनं गोड बातमी दिली आहे. तिच्या घरी एका गोंडस कन्येचं आगमन झालं आहे.
नुकताच तिने मुलीला जन्म दिला. या गोड बातमीनंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
मिनाक्षी राठोडचा पती कैलास वाघमारेनं नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने बाळाच्या पायांचे ठसे असलेला एक फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देताना त्याने ‘माय गोडगोजिरी होऊन परत आली’, असं म्हटलं आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत मीनाक्षीनं साकारलेली देवकीची भूमिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. काहीशी वेंधळी, मनानं तशी स्वच्छ पण कुणाच्याही सांगण्यावरून वाईट वागणारी देवकी तिनं अप्रतिम साकारली. अगदी नवव्या महिन्यापर्यंत मीनाक्षी काम करत होती. गेल्या दोन आठवड्यांपूर्वीच तिने कामातून ब्रेक घेतला होता. तिच्या जागी देवकी म्हणून भक्ती रत्नपारखी दिसत आहे.
मीनाक्षी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. प्रेग्नंसीच्या काळात तिने बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे चिक्कार फोटो शेअर केले होते. यामुळे ती सतत चर्चेत होती. मीनाक्षी उत्तम अभिनेत्री आहेच. पण तिचा नवरा कैलाश हादेखील एक उत्तम अभिनेता आहे. दोघांनी कॉलेजमध्ये असतानाच अभिनय प्रवासाला सुरूवात केली होती.
मीनाक्षी मुळची जालन्याची. तिच्या अभिनयाची सुरुवात झाली ती शाळेपासून. वडील कलाप्रेमी असल्यामुळे नाटक, अभिनय, नृत्य स्पर्धांमध्ये तिला आवर्जून भाग घ्यायला सांगायचे. कॉलेजमध्ये असताना युथ फेस्टिव्हलमध्येही ती नियमितपणे सहभागी व्हायची. परंतु तिचा अभिनयप्रवास सुरू झाला ती मुंबईला आली तेव्हापासून. सर्वप्रथम ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या प्रसिद्ध नाटकात सावित्रीबाई यांची भूमिका मिळाली. या नाटकाचे पाच वर्षांत जवळपास साडे सातशे प्रयोग झालेत. इथून तिच्या करिअरला वेग मिळाला.
जालन्यातील गंगाराम वाडी, अंबड येथील शाळेतून तिने शिक्षण घेतलं. करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली. थिएटर आर्ट्स, मुंबई विद्यापीठ येथून तिने पुढील शिक्षण घेतलं. मयत, कमरबंद, सायकल यासारख्या चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे.
2018 मध्ये मराठी मालिका ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मधून मीनाक्षीने टीव्ही विश्वात पदार्पण केलं. 2020 मध्ये तिला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका मिळाली. मीनाक्षीने अनेक लघुपटांमध्ये काम केलंय.