'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा करतोय 'लय भारी' बिझनेस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 01:03 PM2021-08-18T13:03:20+5:302021-08-18T13:06:54+5:30
'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत लतीकाचे वडील म्हणजेच बापुची भूमिका साकारणारे उमेश दामले आज त्यांच्या मुलामुळेच चर्चेत आहेत.
सध्या स्टारकिड्सचा जमाना आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. हिंदीतच नाही तर मराठीतही अनेक स्टारकिड्स आपल्या आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात एंट्री करत रसिकांचे मनोरंजन करताना दिसतात. मात्र असेही काही कलाकार आहेत ज्यांच्या मुलांनी आई-वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात एंट्री न करता दुसऱ्याच क्षेत्रात नाव कमावत आहे.
सध्या 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत लतीकाचे वडील म्हणजेच बापुची भूमिका साकारणारे उमेश दामले आज त्यांच्या मुलामुळेच चर्चेत आहेत. उमेश दामले यांनी यापूर्वी 'मुळशी पॅटर्न', 'मोगरा फुलला','आजोबा वयात आले', 'रणांगण', 'मितवा','जावई विकत घेणे आहे', 'नकळत सारे घडले', 'एक झुंज वाऱ्याशी' सिनेमा, नाटक आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मात्र त्यांच्या मुलाने वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्र न निवडता व्यवसाय करत आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. उमेश दामले यांच्या मुलाचे नाव आहे मानस दामले. मानस पुण्यामध्ये 'दामले इडली सेंटर' चालवत आहे.पुण्यातील सदाशिव पेठेत भरतनाट्य मंदिराजवळच दामले इडिली सेंटर आहे.
मानसपूर्वी आयटीक्षेत्रात काम करत होता. चांगला पगार, इतर भत्ते आणि अन्य सोई सुविधा यामुळे अशी नोकरी लागली तर ती सोडण्याचा विचार देखील कोणी करणार नाही. पण मानसने नोकरी सोडली त्याने दुसऱ्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी न करता इडली सांबारचा व्यवसाय सुरु केला.वाचून थोडं आश्चर्य नक्कीच वाटेल पण ही सक्सेस स्टोरी आहे मानस दामलेची.
आयटी कंपनीत नोकरी करत असताना लाखोंचे पॅकेजही त्याला होते.गलेलठ्ठ पगाराची नोकरीतून पैसा तर मिळत होता पण कामातून समाधान मात्र मिळत नव्हते. मानसला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा होती.अखेर आयटी कंपनीची नोकरी सोडून स्वतःचा त्याने व्यवसाय सुरु केला.पाककला शास्त्र विषयाची पदवी मानसने मिळवली आहे. नोकरी सोडून व्यवसाय सुरु करणे मानससाठी मोठे आव्हान होते.
कारण सगळ्यांनीच त्याला सुरुवातीला विरोध केला होता. सगळ्यांच्या विरोधात जात त्याने मोठ्या हिमतीने व्यवसाय सुरु केला. विशेष म्हणजे दामले सेंटरमध्ये खवय्यांनाही चटणी आणि विशिष्ट पद्धतीने बनवलेले सांबार खूप आवडते. दूरदूरुन लोकं दामले इडिली सेंटरला भेट देतात. खवय्येही पदार्थांची चव चाखल्यानंतर कौतुक करतात. स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यात जो आनंद आहे तो मानसच्या चेहऱ्यावरही झळकतो.