-आणि 27 सेकंदात माझं आयुष्य..., ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षया नाईकची दुखापतीनंतर अशी झालीये अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 12:10 PM2022-07-21T12:10:13+5:302022-07-21T12:11:20+5:30
Sundara Manamadhye Bharali : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील सर्वांची लाडकी लतिका (Latika)अर्थात अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) सध्या पायाच्या दुखापतीमुळे बेजार आहे.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhye Bharali ) या मालिकेतील सर्वांची लाडकी लतिका (Latika)अर्थात अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) सध्या पायाच्या दुखापतीमुळे बेजार आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या पायाला दुखापत झाली होती. अशाही स्थितीत अक्षया मालिकेचं शूटिंग करत होती. पण आता पायाच्या दुखापतीमुळे अनेक कामांवर मर्यादा आल्या आहेत. आवडता डान्स, आवडती हॉर्स रायडिंग, बाईक रायडिंग असं सगळं ती मिस करतेय. या सगळ्या आवडत्या गोष्टी करत येत नसल्याने अक्षया काहीशी वैतागली आहे. सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहित तिने आपला वैताग व्यक्त केला आहे.
पोस्टसोबत अक्षयाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती मस्तपैकी बागडताना, डान्स करताना, गाडी चालवताना तसेच क्रिकेट खेळताना आणि हॉर्स रायडींग करताना दिसत आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये ती लिहिते, ‘ मला जसं आयुष्य हवं होतं, ते उभं करायला 27 वर्षे गेलीत. स्वतंत्र, मुक्त, बेधुंद आयुष्य जगायला इतकी वर्ष लागली आणि अवघ्या 27 सेकंदांमध्ये माझं आयुष्य पार बदलून गेलं. अर्थात, परिस्थिती कितीही गंभीर असली तरी मला आतापर्यन्त आयुष्यात मिळालेल्या गोष्टींसाठी मी स्वत:ला नशीबवान मानते. पण आता माझ्यासोबत जे काही घडलं त्या परिस्थितीमध्ये मी बरी आहे असं म्हंटल तर ते खोटं ठरेल. या कठीण परिस्थितीत माझी काळजी घेणारं कुटुंब माझ्यासोबत आहे, मित्र आहेत आणि चांगले डॉक्टर्स सुद्धा आहेत. खास म्हणजे, या परिस्थितीतही माझ्याकडे काम आहे आणि या सगळ्याबद्दल मी स्वत:ला खरंच खूप भाग्यवान समजते. पण ही पायाची दुखापत आता मला त्रास देत आहे. पुढच्या दोन महिन्यासाठी मी माझ्या पायांवर उभं राहू शकत नाही या विचाराने मला भीती वाटते.
पुढचे काही दिवस मी प्रवास करू शकत नाही, डान्स करू शकणार नाही, माझी गाडी चालवू शकणार नाही, मला जेव्हा वाटेल तेव्हा हॉटेलमध्ये खायला जाऊ शकणार नाही. या गोष्टीची खंत वाटत आहे. मला कधीच वाटलं नव्हतं मला या सगळ्या गोष्टींबद्दल एवढं वाईट वाटेल. पण मला कोणीही सहानुभूती देणारे मेसेज करू नका कारण त्याने मला आणखी वाईट वाटेल. माझी सध्याची परिस्थिती कोणीच बदलू शकत नाही हे मला मान्य करावे लागले. मला फक्त माझं मन मोकळं करायचं होतं म्हणून मी ही पोस्ट लिहिली आहे.
अक्षयाला डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पण ती सध्या एक आठवडा शूटिंग आणि एक आठवडा पूर्ण आराम करते आहे.