सुनिधीने ‘माऊंटन सोल्स’ बँडच्या सदस्यांना दिली अनोखी भेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 04:34 PM2018-08-24T16:34:46+5:302018-08-24T16:38:09+5:30
सुनिधी चौहानने‘माऊंटन सोल्स' बॅण्डच्या प्रत्येक सदस्याच्या जॅकेटमध्ये एक चिठ्ठीही ठेवली होती. हा संदेश वाचून या बॅण्डमधील सर्व सदस्य आनंदाने हरखून गेले.
गुरदीपच्या ‘माऊंटन सोल्स’ने ‘दिल है हिंदुस्तानी-2’तील परीक्षक आणि नामवंत पार्श्वगायिका सुनिधी चौहान हिच्यावर आपला प्रभाव टाकण्यासाठी कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही. त्यांनी आपल्या भरदार गाण्याने सुनिधीवर चांगला ठसा उमटविला आहे. सुनिधीने माऊंटन सोल्समधील प्रत्येक सदस्याला एक चामड्याचे जॅकेटच भेट दिले, तसेच प्रत्येक जॅकेटमध्ये तिने एक चिठ्ठीही ठेवली होती. त्या चिठ्ठीवर तिने स्वत: संदेश लिहिला होता की तिने आजवर पाहिलेल्या अनेक बॅण्डमध्ये हा बॅण्ड सर्वात उत्तम होता. हा संदेश वाचून या बॅण्डमधील सर्व सदस्य आनंदाने हरखून गेले. गेल्या भागात आपण पाहिले की या बॅण्डमधील एक सदस्य लाप्का हा सुनिधीवर भाळला होता. त्याला तिच्याबरोबर नृत्य करण्याची संधी मिळाली.
सुनिधी चौहानने सांगितले, “या कार्यक्रमातील ‘माऊंटन सोल्स’ हा माझा पहिल्यापासूनच आवडता बॅण्ड राहिला आहे. दरवेळी ते कोणती तरी नवी संकल्पना सादर करतात जी पाहून आम्ही स्तिमित होतो. दुसरं असं की या बॅण्डचे सदस्यांनी माझ्यावर विशेष प्रेम केलं असल्याने त्यांच्या या प्रेमाला प्रतिसाद देणं ही माझी जबाबदारी आहे. त्यांना मी दिलेली भेटवस्तू पाहून ते किती खुश झाले, हे पाहून मलाही बरं वाटलं.” ‘दिल है हिंदुस्तानी-2’ हा भारतीय संगीताच्या प्रेमामुळे देशांच्या सरहद्दी पुसून टाकणारा आणि हिंदुस्तानी संगीतावर प्रेम करणाऱ्या जगभरातील संगीतप्रेमींना एकत्र आणणारा रिअॅलिटी कार्यक्रम आहे. भारतीय संगीताचा प्रभाव अधोरेखित करणारा आणि जगभरातील स्पर्धकांकडून लोकप्रिय भारतीय संगीताला नवा आयाम देणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील हिंदुस्तानींचं एक संमेलनच भरलेलं असतं. या कार्यक्रमात जगभरातील गुणी गायक आणि संगीतकार लोकप्रिय भारतीय गाणी गातील. पण ती गाणी ते स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत गातात.