सगळी भांडणं विसरून कपिल शर्माच्या रिसेप्शनला हजेरी लावणार त्याचा हा लाडका मित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 03:52 PM2018-12-13T15:52:35+5:302018-12-13T16:00:04+5:30
लग्नानंतर कपिल त्याच्या बॉलिवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील मित्रमैत्रिणींसाठी एक रिसेप्शन देणार आहे. या रिसेप्शसाठी त्याने अनेकांना निमंत्रण पाठवले आहे.
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर या दोघांनी कॉमेडी नाईट्स विथ कपिल, द कपिल शर्मा शो यांसारखे हिट कार्यक्रम दिलेले आहेत. पण गेल्या अनेक महिन्यांपासून ते एकमेकांशी बोलत नाहीयेत. कपिल शर्माने काल त्याची प्रेयसी गिन्नी चतरथसोबत लग्न केले. केवळ त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी लग्नाला उपस्थित होते. कृष्णा अभिषेक, भारती सिंगने कपिलच्या लग्नाला आवर्जून उपस्थिती लावली होती. कपिलने त्यांच्या लग्नाचा फोटो नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
लग्नानंतर कपिल त्याच्या बॉलिवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील मित्रमैत्रिणींसाठी एक रिसेप्शन देणार आहे. या रिसेप्शसाठी त्याने सुनील ग्रोव्हरला निमंत्रण पाठवले असून सुनील देखील त्यांच्या निमंत्रणाचा मान राखून रिसेप्शनला जाणार आहे. सुनीलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, मी कपिलच्या मुंबई येथील रिसेप्शनला नक्कीच जाणार आहे. याआधी देखील एआयएनएसला दिलेल्या मुलाखतीत त्याने कपिलला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. तो म्हणाला होता की, आम्ही दोघांनी एकत्र खूप चांगले काम केले आहे. त्यामुळे आमच्यात आजही एक भावनिक नाते आहे. कपिलला लग्नासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. लग्न झालेल्या लोकांवर आजवर कपिलने खूप सारे जोक मारले आहेत. आता लग्न झाल्यानंतर कशी परिस्थिती बदलते हे त्याला कळेलच.
गेल्या वर्षी सिडनीत शो करण्यासाठी द कपिल शर्मा शोची संपूर्ण टीम गेली होती. भारतात परतत असताना शोची टीम बिझनेस क्लासमधून प्रवास करत असताना कपिल शर्मा चांगलाच नशेत होता. नशेत असताना त्याची आणि सुनीलची बाचाबाची झाली. यानंतर कपिलने सुनीलला शिवीगाळ करत मारहाणदेखील केली होती. तसेच तू माझा नोकर आहेस असेही त्याला तो बोलला होता. या वादानंतर सुनीलने फेसबुकला एक पोस्ट टाकली होती. त्यात त्याने म्हटले होते की, तुझ्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. तू प्राण्यांचा जसा आदर करतोस तसा माणसांचाही करायला शिक असा सल्ला मी नक्कीच तुला देईन. तुझ्यासारखे सगळे टायलेंटेड नसतात. जर सगळेच टायलेंटेड असते तर तुझी किंमत कोणी केली असती का? याचा एकदा तरी विचार कर आणि तुझी चुकीची गोष्ट कोणी सुधारत असेल तर त्याच्याशी असभ्य भाषेत बोलू नकोस. तुझ्यासोबत जे महिला प्रवासी प्रवास करत होत्या, त्यांना तुझ्या स्टारडमशी काहीही घेणे देणे नाहीये. त्यांच्यासमोर असभ्य भाषा वारण्याचे टाळ आणि तू तुझ्या कार्यक्रमातून कोणालाही काढू शकतोस याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद. तू तुझ्या क्षेत्रात चांगला आहेस. पण स्वतःला देव समजू नकोस. तुझ्या यशासाठी तुला शुभेच्छा.