‘सुपर डान्सर 4’मधून शिल्पा शेट्टी ‘आऊट’, मलायका अरोरा बनणार जज!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 18:57 IST2021-05-04T18:53:33+5:302021-05-04T18:57:08+5:30
कोरोनामुळे शूटींगचे ठिकाण बदलले, सेट बदलला, जजही बदलणार...

‘सुपर डान्सर 4’मधून शिल्पा शेट्टी ‘आऊट’, मलायका अरोरा बनणार जज!!
कोरोनामुळे अनेक टीव्ही शोचा सेट अन्य राज्यांत हलवण्यात आला आहे. ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ (Super Dancer 4 )या शोचे शूटींगही दमणला होतेय. तूर्तास या रिअॅलिटी शोबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आलीये. चर्चा खरी मानाल तर शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) शोमधून तूर्तास ‘सुट्टी’ झाली असून तिच्या जागी मलायका अरोरा (Malaika Arora) हा शो जज करताना दिसणार आहे.
कोरोनाचा धोका बघता, शिल्पा शेट्टी व दिग्दर्शक अनुराग बासू यांनी या शोमधून ब्रेक घेतला होता. यासाठी त्यांनी खासगी कारण समोर केले होते. अनुराग व शिल्पा यांच्या गैरहजेरीत रेमो डिसुजा व फराह खान यांनी शो जज केला होता. मुंबईतच या एपिसोडचे शूटींग झाले होते. पण आता शोच्या पुढच्या एपिसोडचे शूटींग दमणला होणार आहे. रिपोर्टनुसार, अनुराग बासू शो ज्वाईन करणार आहे. मात्र शिल्पा शेट्टीने आणखी काही दिवस हा शो ज्वाईन न करण्याचा निर्णय घेतल्याचे कळतेय. त्यामुळे तिच्या जागी आता ‘छम्मा छम्मा गर्ल’ मलायका अरोराची वर्णी लागल्याचे कळतेय.
शोचे निर्माते रंजीत ठाकूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, शिल्पा आणखी काही शो जज करू शकणार नाही. त्यामुळे आम्ही तिच्या जागी मलायकाची निवड केली आहे. टेरेन्स लुईसही येणा-या काही एपिसोडमध्ये हजेरी लावणार आहे. दमणमधील शूटींगबाबत त्यांनी सांगितले, आमची संपूर्ण टीम इथे आहे आणि प्रत्येकाची कोरोना टेस्ट होत आहे. संपूर्ण सावधगिरी बाळगून आम्ही शूटींग करत आहोत. शोचे जज मुंबईवरून दमणला पोहोचल्यावर त्यांचीही कोरोना टेस्ट होईल. हा अतिशय कठीण काळ आहे. आम्ही कमीत कमी लोकांमध्ये शूटींग करत आहोत.