सुप्रिया पाठारे झाल्या होत्या किडनॅप; राजस्थानमधून बाळासाहेब ठाकरेंनी केली होती सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 08:32 AM2024-04-08T08:32:13+5:302024-04-08T08:32:54+5:30
Supriya pathare: एका मुलाखतीमध्ये सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे (supriya pathare). आजवरच्या कारकिर्दीत सुप्रिया यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच त्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत झळकल्या होत्या. सुप्रिया पाठारे आज त्यांचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्याविषयी अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत. यामध्येच त्यांनी एका मुलाखतीमध्ये दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा सांगितला होता. सुप्रिया पाठारे यांची बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे राजस्थानमधून सुखरुप सुटका झाली होती. त्यांची जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आली आहे.
१९९५ मध्ये सुप्रिया पाठारे यांना एक निर्माता शुटिंगच्या निमित्ताने राजस्थानला घेऊन गेला होता. मात्र, इथे गेल्यानंतर त्याने सुप्रिया यांना चक्क तीन महिने डांबून ठेवलं. इतकंच नाही तर बंदुकीच्या धाकावर त्यांच्याकडून अभिनयही करवून घेतला. या संकटसमयी त्यांनी कोड लँग्वेजचा वापर करत बाळासाहेबांकडे मदत मागितली आणि बाळासाहेब यांनी कसलाही विचार न करता सुप्रियांची सुखरुपपणे सुटका केली.
"एक निर्माता होता जो शुटिंगच्या निमित्ताने मला राजस्थानला घेऊन गेला होता. तिथे तीन महिने त्याने मला डांबून ठेवलं. शूटिंगसाठी मी एकटीच इकडून गेले होते. त्या व्यक्तीने तब्बल तीन महिने बंदुकीचा धाक दाखवून माझ्याकडून अभिनय करुन घेतला. त्याने मला कुटुंबियांशी फोनवरुन बोलण्याची परवानगी दिली होती. मात्र, तो मला मराठीत बोलू देत नव्हता. या परिस्थितीमध्ये मी कसंबसं करत कोड लँग्वेजचा वापर करुन माझ्या बहिणीला माझ्यावर ओढावलेल्या परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर माझ्या कुटुबियांनी बाळासाहेब ठाकरे याच्याकडे मदत मागितली", असं सुप्रिया पाठारे म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "बाळासाहेबांना ही गोष्ट कळल्यानंतर राजस्थान पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेलं आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. एक दिवस राजस्थान पोलिसांतील शिपाई माझ्या शोधात आले आणि त्यांनी माझी सुटका केली. त्यानंतर मला कळलं की, या सगळ्या प्रकारात बाळासाहेबांनी जातीने लक्ष घातलं होतं. त्यामुळे मी आयुष्यभर बाळासाहेबांची ऋणी राहीन."
दरम्यान, सुप्रिया पाठारे सध्या स्टार प्रवाहवरील साधी माणसं या मालिकेत झळकत आहेत. या मालिकेत त्या खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. यापूर्वी त्यांनी 'ठिपक्यांची रांगोळी', 'जागो मोहन प्यारे' , 'मोलकरीणबाई', 'पिंजरा' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.