या मराठी अभिनेत्रीवर ओढावला होता धडकी भरवणारा प्रसंग,निर्मात्याने 3 महिने केले होते कैद, बाळासाहेबांच्या मदतीने झाली होती सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 01:20 PM2021-05-20T13:20:55+5:302021-05-20T13:26:33+5:30
'1995 मध्ये एका सिनेमाच्या शुटिंगसाठी दरम्यान तीन महिने अक्षरशः कैद करुन ठेवले होते. कोणासोबतही बोलू दिले जात नव्हते.
सुप्रिया पाठारे हे नाव आज घराघरात प्रसिद्ध आहे.सुप्रिया यांनी आपल्या कॉमेडीच्या भन्नाट टायमिंगने रसिकांच्या काळजात वेगळं स्थान मिळवलं आहे. महिला कॉमेडीयन म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुप्रिया पाठारेबद्दल जाणून घेण्यासाठी रसिक कायमच उत्सुक असतात. अभिनयक्षेत्रात कॉमेडीच्या माध्यमातून करिअरमध्येही यशाची नवी उंची गाठली आहे.
सुप्रियाने विनोदी कार्यक्रम 'फु बाई फु', 'जागो मोहन प्यारे' यांसारख्या लोकप्रिय मालिकेतून रसिकांचे भरघोस मनोरंजन केले आहे.मराठी मनोरंजन क्षेत्रात विनोदसम्राज्ञी म्हणून सुप्रिया पाठारे ओळखली जाते. आपल्या विशिष्ट शैलीमुळे प्रसिद्ध असली विनोदाच्या क्षेत्रात पाय रोवण्यासाठी 16 वर्षांचा खडतर प्रवास करावा लागल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. सुप्रिया पाठारेने टीवी मालिकाव्यतिरिक्त सिनेमातही काम केले आहे. 'सुपारी बायकोची' , 'फक्त लढ म्हणा' , 'करु या कायद्याची बात' , 'बालक पालक' , 'टाइमपास' , 'टाइमपास 2' , 'चि. व चि. सौ. का या' सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
अभिनयक्षेत्रात काम करताना अनेक चढउतारही त्यांच्या आयुष्यात आले. एका मुलाखतीत त्यांनी एक किस्सा सांगितला होता. हा किस्सा ऐकून सारेच थक्क झाले. १९९५ साली सुप्रिया यांच्यावर खूप कठिण प्रसंग ओढावला होता. एका चित्रपट निर्मात्याने चक्क त्यांना एका खोलीत डांबून ठेवले होते. जवळपास तीन महिने त्यांना खोलित कैद करुन ठेवले होते.
या तीन महिन्यांत फक्त घरच्यांशीच बोलायची परवानगी त्यांना होती. बोलतानाही फक्त हिंदीतच बोलायचे असा दमही त्यांना देण्यात आला होता. एकदा संधी मिळताच सुप्रिया यांनी बहिणीला सगळा प्रकार सांगण्यात यशस्वी ठरल्या. सुप्रिया यांची सुटका करण्यासाठी थेट बाळासाहेबांची मदत घेण्यात आली होती. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं निर्मात्यापासून सुटका करुन घेतल्याचे सांगितले होते.