"सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा" ७ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 05:59 PM2023-10-03T17:59:57+5:302023-10-03T18:01:39+5:30
सूर नवा ध्यास नवाच्या आवाज तरुणाईचा हे नवं पर्व लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच या नव्या पर्वाची उत्सुकता लागली आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक असलेला शो म्हणजे 'सूर नवा ध्यास नवा'. आतापर्यंत या कार्यक्रमाचे जवळपास पाच पर्व पार पडले असून प्रत्येक पर्व सुपरहिट ठरला आहे. सूर नवा ध्यास नवाच्या आवाज तरुणाईचा हे नवं पर्व लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच या नव्या पर्वाची उत्सुकता लागली आहे. यामध्येच कलर्स मराठीने नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर केला आहे.
रंगमंचावर सप्तसुरांची उधळण होणार, नवनवे आविष्कार प्रत्येक आठवड्यात सादर होणार. मंच सज्ज आहे तुम्ही देखील सज्ज व्हा या सुरेल मैफिलीसाठी. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री रसिका सुनील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असून आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले महेश काळे तसेच हरहुन्नरी अदाकार अवधूत गुप्ते कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत. उत्तमातून उत्तर सूर शोधण्याचा हा ध्यास सुरू होत आहे ७ ऑक्टोबरपासून शनि - रवि रात्री ९. ०० वा. पाहता येणार आहे.
सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण पर्वात जुनी गाणी नव्या रुपात सजणार आहेत. प्रत्येक गाण्याला नाविन्याची किनार असणार आहे. आणि ही जबाबदारी मोठ्या उत्साहाने पार पडणार आहे आजची महाराष्ट्राची तरुण पिढी. कारण तरुण पिढीकडे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. त्यांच्यात एक जिद्द असते, एक प्रकारची वेगळी ऊर्जा असते काहीतरी वेगळं करून दाखविण्याची. कार्यक्रमाच्या ऑडिशनला महाराष्ट्रभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. यातून निवडलेल्या १२ सूरवीरांमध्ये रंगणार आहे सामना. कोण ठरणार महविजेता ? कोणाला मिळणार मानाची कट्यार हे कळेलच.