कास्टिंग करताना फॉलोवर्स बघितले जातात! सुयश टिळकने सांगितलं पडद्यामागचं भयाण वास्तव, म्हणाला- "मालिकांमध्ये..."
By कोमल खांबे | Updated: March 10, 2025 17:55 IST2025-03-10T17:51:37+5:302025-03-10T17:55:09+5:30
इंडस्ट्रीत सध्या फॉलोवर्स बघून कास्टिंग करण्याचा ट्रेंड आल्याचं दिसत आहे. अनेक सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर्स मालिकेत झळकले आहेत. याबाबत सुयशने त्याचं मत मांडलं.

कास्टिंग करताना फॉलोवर्स बघितले जातात! सुयश टिळकने सांगितलं पडद्यामागचं भयाण वास्तव, म्हणाला- "मालिकांमध्ये..."
सुयश टिळक हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. का रे दुरावा मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुयशने अनेक नाटक आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. नुकतंच सुयशने एका मुलाखतीत पडद्यामागचं भयाण वास्तव सांगितलं आहे. इंडस्ट्रीत सध्या फॉलोवर्स बघून कास्टिंग करण्याचा ट्रेंड आल्याचं दिसत आहे. अनेक सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर्स मालिकेत झळकले आहेत. याबाबत सुयशने त्याचं मत मांडलं.
सुयशने नुकतीच झेन एंटरटेनमेंटला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने फॉलोवर्स पाहून कास्टिंग होण्यावर त्याचं मत सांगितलं. तो म्हणाला, "कास्टिंग करताना फॉलोवर्स बघितले जातात. अनेकदा फोन येतात की तुमचं नाव शॉर्टलिस्ट झालंय तुमची सोशल मीडियाची लिंक पाठवा. तुमचे फॉलोवर्स किती आहेत, ते बघायचं आहे. समजा जर मला शून्य फॉलोवर्स असतील तर मग काय करशील? म्हणजे मग मी कलाकार नाहीये का? जर मला फॉलोवर्स आहेत तरच मला कलाकार म्हणून मान्यता आहे. हे जे समीकरण बनलंय ते खूप धोकादायक आहे. असा पायंडा जर पडत असेल तर त्याने प्रॉब्लेम होऊ शकतो".
"मालिकांच्या बाबतीतही हे मी बघितलं आहे. मालिकांच्या कास्टिंगच्या वेळी खासकरून मुलींचं कास्टिंग करताना ज्यांचं फॅन फॉलोविंग चांगलं आहे किंवा ज्या मुली सोशल मिडियावर पॉप्युलर आहे, त्यांना प्राधान्य दिलं जातं. आणि मग त्या जेव्हा कॅमेरासमोर उभं राहतात तेव्हा १०-१५ टेक होतात. सगळे कलाकार, टेक्निशियन त्या शॉटसाठी थांबलेले असतात. मग महिनाभरानंतर त्यांना जाणवतं की आपण चूक केलीय. मग तिथे नवीन चेहरा येतो", असंही पुढे सुयश म्हणाला.