‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम मुनमुन दत्ताला आला पॅनिक अटॅक, अर्ध्यावर सोडावा लागला ट्रेक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 10:33 AM2019-07-11T10:33:14+5:302019-07-11T10:33:45+5:30
मुनमुनने १२ हजार फुटांचा ट्रेक चढून पूर्णही केला. पण याचदरम्यान तिला पॅनिक अटॅक आला आणि अर्ध्या रस्त्यातून तिला परतावे लागले.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेतील बबिता अर्थात मुनमुन दत्ताला फिरण्याची प्रचंड आवड आहे. नुकतीच ती पूर्व आफ्रिकेच्या ट्रिपवर होती. या ट्रिपदरम्यान मुनमुन टांझानियात ट्रेकचा अनुभव घेणार होती. या ट्रेकसाठी मुनमुन अनेक दिवसांपासून तयारी करत होती. अखेर तो दिवस उजाडला. मुनमुनने १२ हजार फुटांचा ट्रेक चढून पूर्णही केला. पण याचदरम्यान तिला पॅनिक अटॅक आला आणि अर्ध्या रस्त्यातून तिला परतावे लागले.
होय, मुनमुन माउंट किलिमंजारो येथे ट्रेक करण्यासाठी गेली होती. पण किलिमंजारो नजरेच्या टप्प्यात दिसत असताना मुनमुनला आपला प्रवास अर्धवट सोडावा लागला.
या ट्रेकचा अनुभव मुनमुनने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘दोन दिवसांत आम्ही दुस-या कॅम्पवर पोहोचलो होतो. किलिमंजारो नजरेच्या टप्प्यात होते. पण क्लॉस्ट्रोबिया आणि पॅनिक अटॅकमुळे गर्द अंधारात मला शिखरावरून खाली आणण्यात आले. दिवसात दोनदा गंभीर क्लॉस्ट्रोबिया आणि पॅनिक अटॅकमुळे माउंट किलिमंजारो ट्रेक मला अर्ध्यावर सोडावा लागला. मी आमच्या टीममधली शारीरिक आणि मानसिक पातळीवर सर्वात मजबूत व्यक्ती होती. वेळेच्या आधीच मी ते शिखर सर करणार, हा विश्वास मला होता. पण प्रत्येक गोष्ट तुमच्या हातात असतेच असे नाही. क्लॉस्ट्रोफोबियाचा विचार मी ट्रेकच्याआधी केला नव्हता. पण त्या शिखराने मला तो विचार करायला भाग पाडले. तो गर्द काळोख मला घाबरत होता. मी इतकी घाबरली होती की माझे हृदय जोरात धडधडत होते. कॅम्पच्या बाहेर मी जवळजवळ बेशुद्धच पडले होते. मी ट्रेक तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतला कारण, सुर्यास्तानंतरच्या अंधाराने मला धडकी भरत होती, असे तिने लिहिले.
जीव वाचवल्याबद्दल तिने टीमचे आभारही मानलेत. तसेच हा अनुभव खूप काही शिकवून गेल्याचेही म्हटले. यावेळी मी माझा ट्रेक पूर्ण करू शकले नाही. पण पुन्हा कधीतरी हा ट्रेक मी नक्की पूर्ण करेल, असा विश्वासही तिने बोलून दाखवला.