मुलीच्या जन्मावेळी कंगाल झाला होता जेठालाल; 450 रुपयांमध्ये चालवला होता घरखर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 11:13 AM2023-05-14T11:13:25+5:302023-05-14T11:14:55+5:30
Dilip joshi: 'हम आपके हैं कौन' ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आपल्याला काम मिळेल असं दिलीप जोशींना वाटलं होतं. मात्र, प्रत्यक्षात तसं काही झालं नाही.
छोट्या पडद्यावर तुफान गाजलेला कार्यक्रम म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. गेल्या १४-१५ वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं अविरतपणे निखळ मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जवळपास सगळेच कलाकार लोकप्रिय आहेत. मात्र, त्यातही जेठालाल आणि दया भाभी यांची नेटकऱ्यांमध्ये विशेष चर्चा रंगते. यात सध्या जेठालाल म्हणजेच अभिनेता दिलीप जोशी (Dilip Joshi) यांची चर्चा होत आहे. तारक मेहतामुळे नावारुपाला आलेल्या दिलीप जोशी यांनी एकेकाळी खूप स्ट्रगल केला आहे. एक वेळ अशी होती की त्यांच्याकडे मुलीच्या जन्मावेळी पैसेदेखील नव्हते.
'तारक मेहता..' या मालिकेत झळकण्यापूर्वी दिलीप जोशी यांनी अनेक गाजलेल्या सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं आहे. यात 'हम आपके हैं कौन' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट त्यावेळी ब्लॉकबस्टर ठरला त्यामुळे आता आपल्याला भरपूर काम मिळेल असं दिलीप जोशींनी वाटलं होतं. मात्र, प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. या सिनेमानंतर त्यांना बराच काळ कोणतीही ऑफर मिळाली नाही. अलिकडेच त्यांनी द बॉम्बे जर्नीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी याविषयी भाष्य केलं.
जेव्हा मला 'हम आपके है कौन'ची ऑफर मिळाली होती तेव्हा मी आर्थिक समस्यांना सामोरा जात होतो. मला पैशांची प्रचंड गरज होती. 1992 साली माझी मुलगी नियतीचा जन्म झाला. त्यावेळी माझ्या बँक खात्यात फक्त 25 हजार रुपये होते. त्यापैकी 13-14 हजार रुपये हॉस्पिटलचं बिल भागविण्यात गेले. त्यावेळी मी एकच नाटक करत होतो. ज्याच्या एका प्रयोगातून मला 400 ते 450 रुपये मिळायचे, असं दिलीप जोशी म्हणाले.
पुढे ते म्हणाले, "त्यावेळी मला हम आपके है कौन हा चित्रपट मिळाला होता. मला वाटलं आता माझं आयुष्य सेट झालं आहे. पण असं अजिबात झालं नाही. तो चित्रपट आला आणि सुपरहिट झाला आणि त्यानंतरही मला काम मिळालं नाही. बऱ्याच वर्षांनंतर मला शाहरुखसोबत '1 टु का 4'मध्ये काम मिळालं होतं. तोपर्यंत माझ्याकडे कामाची चणचण होती.''
दरम्यान, बरीच वर्ष स्ट्रगल केल्यानंतर तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या माध्यमातून दिलीप जोशी यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेनंतर त्याच्या यशाचा आलेख चांगलाच उंचावला.