"शॉर्टलिस्ट केल्या आहेत...", काहीच दिवसात तारक मेहता मालिकेत दिसणार दयाबेन; निर्मात्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 12:46 IST2025-04-15T12:45:35+5:302025-04-15T12:46:49+5:30
आम्ही दयाभाभीला लवकरच परत आणू...

"शॉर्टलिस्ट केल्या आहेत...", काहीच दिवसात तारक मेहता मालिकेत दिसणार दयाबेन; निर्मात्यांची माहिती
'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ootah Chashma) मालिकागेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मात्र सहा वर्षांपासून मालिकेतून दयाबेनचं मुख्य कॅरेक्टरच नसल्याने मालिकेत मजाच राहिलेली नाही अशीच अनेकांची प्रतिक्रिया आहे. दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) मॅटर्निटी लीव्हवर गेली आणि नंतर परत न येता तिने मालिकाच सोडली. तिच्या सारखी दयाबेनची भूमिका साकारणं मोठं आव्हानच आहे. दयाबेन मालिकेत परत येणार अशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. आता नुकतंच निर्माते असित मोदींनी याबाबतीत अपडेट दिलं आहे.
'इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत असित मोदी म्हणाले, "आम्ही दयाभाभीला लवकरच परत आणू. दयाभाभी गेल्यानंतर शोमध्ये मजा राहिली नाही असं लोक म्हणत आहेत. मी सुद्धा याच्याशी पूर्णपणे सहमत आहे. आमची संपूर्ण टीम दयाभाभीला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे."
"ते पुढे म्हणाले, "आम्ही या भूमिकेसाठी काही जणींना शॉर्टलिस्ट केलं आहे. लवकरच तुमची दयाभाभीशी भेट होईल. दिशाने मालिका सोडून ५ वर्ष होऊन गेली आहेत. आम्ही सगळेच तिची आठवण काढतो. तिला तिचे सहकलाकार आणि संपूर्ण क्रूची काळजी असते. दिशा वकानीसारखीच कोणीतरी शोधण्याचे आमचे प्रयत्न आहेत."
दयाबेनच्या भूमिकेसाठी आतापर्यंत अनेक मुलींच्या ऑडिशन झाल्या. मध्यंतरी टीव्ही अभिनेत्री काजल पिसल दयाबेन साकारणार अशी चर्चा पसरली. काजलचा दयाबेनच्या लूकमधला फोटोही व्हायरल झाला. मात्र तो २०२२ सालचा ऑडिशनचा फोटो असून आपण फायनल झालो नसल्याचं तिने स्पष्टीकरण दिलं होतं. यामुळे नक्की कोण दयाबेन साकारणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.