तारक मेहता का उल्टा चष्मामधील या अभिनेत्याने मागितली माफी, हिंदी भाषेला म्हटले होते मुंबईची भाषा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 06:55 PM2020-03-03T18:55:55+5:302020-03-03T18:57:32+5:30
तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित कुमार मोदी यांनी ट्विटरद्वारे स्पष्टीकरण दिल्यानंतर या मालिकेतील एका कलाकाराने लेखी माफी मागितली आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये गोकुळधामचे सदस्य मातृभाषेवरून एकमेकांशी भिडताना दिसले. अर्थात हा राडा वाढण्याआधी बापूजी चंपक लाल यांनी मध्यस्थी केली आणि मातृभाषेवरून सुरू झालेला गोकुलधाममधला राडा थांबवला. मालिकेतला राडा थांबला असला तरी बाहेर मात्र यावरून एक दुसरा ‘राडा’ सुरू झाला. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मालिकेच्या या एपिसोडबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
मनसेने आक्षेप नोंदवल्यानंतर तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित कुमार मोदी यांनी ट्विटरद्वारे स्पष्टीकरण दिले. आता असित कुमार मोदी यांच्यानंतर या मालिकेत चंपक चाचाच्या भूमिकेत असलेल्या अमित भटने लेखी माफी मागितली आहे. त्याने माफीनाम्यात लिहिले आहे की, मी अमित भट तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करतो. सदर मालिकेत मी चंपक चाचा ही भूमिका साकारतो. या मालिकेत काम करत असताना लेखकाने दिलेले संवाद बोलताना मुंबई येथील भाषा हिंदी आहे असे माझ्याकडून चुकून बोलले गेले आहे. कारण स्क्रिप्टमध्ये तसे शब्दे होते. तरीदेखील मुंबई येथील भाषा हिंदी नसून मराठी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. सदर झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी पण मागतो. यापुढे अशी चूक होणार नाही याची मी व्यक्तीशः दखल घेईन. वरील बाब समजून घेऊन आपण मला माफ कराल की विनंती...
‘आपले गोकुलधाम कुठे आहे, मुंबईत आणि मुंबईची भाषा काय आहे? हिंदी,’ असा एक संवाद बापूजी चंपक लाल या एपिसोडमध्ये म्हणताना दिसले होते. अमेय खोपकर यांनी नेमक्या याच संवादावर आक्षेप घेत, ‘हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता,’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. यांची मस्ती उतरवावीच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता.