Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: मिसेस सोधीने 'तारक मेहता' शो सोडला, असित कुमार मोदींवर केले लैंगिक छळाचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 03:16 PM2023-05-11T15:16:07+5:302023-05-11T15:17:33+5:30
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहता मालिकेत मिसेस सोधीची भुमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने निर्माते असित कुमार मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: सोनी सब वरील प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सध्या वाईट कारणांमुळे खूप चर्चेत आली आहे. मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारे शैलेश लोढा काही काळापूर्वी शो सोडून गेले. शैलेश लोढा यांच्यानंतर आता मिसेस रोशन सोधी यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिनेही या शोला अलविदा केला आहे. शो सोडल्यानंतर जेनिफरने निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. तिने असित मोदी आणि त्यांच्या प्रॉडक्शन टीममधील दोन लोकांविरुद्ध मुंबईच्या पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना जेनिफर म्हणाली की, 'माझा 14 वर्षांचा वनवास अखेर संपला, मी खूप आनंदी आहे. खरं तर हे लोक खूप शक्तिशाली लोक आहेत, ते तुम्हाला घाबरवतात. त्यांच्यासमोर तोंड कसे उघडावे, या विचाराने मी घाबरून जायचे. पण हळूहळू माझ्या संयमाचा बांध फुटला आणि आता भीतीही संपली आहे.
जेनिफर म्हणाली की, असित मोदीने केलेल्या काही कमेंट्समुळे ती अस्वस्थ झाली होती. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले. पण, 2019 मध्ये जेव्हा तारक मेहताची टीम सिंगापूरला शूटिंगसाठी गेली होती, तेव्हा असित मोदीने तिला तिचे ओठ खूप छान दिसतात असे म्हटले. पुढे याच ट्रिपमध्ये तिला असित मोदीने त्यांच्या रुममध्ये एकत्र व्हिस्की प्यायलाही बोलावले. असित मोदीचे शब्द ऐकून जेनिफर खूप घाबरली होती.
याबाबत जेनिफर म्हणाले की, जर तिच्यासोबत असे घडत असेल, तर एक दिवस शुटिंगसाठी येणाऱ्या छोट्या कलाकारांचे काय होत असेल, याची कल्पनाही करू शकत नाही. सिंगापूरच्या घटनेनंतर जेनिफरची स्क्रीन स्पेस कमी झाल्याचे तिने सांगितले. आणखी एक प्रसंग शेअर करताना जेनिफर म्हणाली की, तिला तिच्या कुटुंबासह स्वित्झर्लंडला जायचे होते, यासाठी तिने प्रॉडक्शन हाऊसकडून 15 दिवसांची रजा मागितली. पण प्रॉडक्शनकडून ती नाकारण्यात आली. तिने रडत असित मोदीला फोन केला, तेव्हा ते म्हणाले रडू नकोस, माझ्यासमोर असतीस तर मी तुला मिठी मारली असती.
इतरत्र काम न करणे, सोशल मीडियावर फोटो पोस्ट न करणे अशा अनेक गोष्टींसाठी कलाकाराला त्रास दिला जातो, असेही जेनिफरने सांगितले. सोहेल रमानी आणि जतीन यांच्याबद्दल बोलताना जेनिफर म्हणते की, त्यांच्याकडून खूप गैरवर्तन झाले. त्यामुळेच तिने त्यांच्याविरोधातही तक्रार दाखल केली आहे. जेनिफरच्या वतीने वकील अमित खरे बाजू मांडणार आहेत.