TMKOC: काय सांगता? ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे कलाकार आता शो सोडूच शकणार नाहीत...??
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 05:46 PM2022-08-09T17:46:32+5:302022-08-09T17:51:16+5:30
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : अलीकडे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अनेक कलाकार एकापाठोपाठ एक शो सोडून जात आहेत आणि यामुळे चाहते चांगलेच नाराज आहेत. पण आता निर्माते असित मोदी यांनी यावरचा एक उपाय शोधला आहे...
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) ही मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण मागच्या काही वर्षांत या मालिकेतील अनेक कलाकार मालिका सोडून गेलेत. दयाबेन अर्थात ही भूमिका साकारणारी दिशा वकानी गेली ती पुन्हा परत आलीच नाही. अर्थात याऊपरही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची लोकप्रियता कमी झाली नाही. मालिकेच्या टीआरपीचा ग्राफ चढाच राहिला आहे. पण अलीकडे या मालिकेतील अनेक कलाकार एकापाठोपाठ एक शो सोडून जात आहेत आणि यामुळे चाहते चांगलेच नाराज आहेत. पण आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी यांनी यावरचा एक उपाय शोधला आहे. होय, आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा कोणताच कलाकार शो सोडून जाऊ शकणार नाही. होय, चर्चा खरी मानाल तर असित मोदी यांनी स्टाकास्टसाठी एक नवं कॉन्ट्रॅक्ट बनवलं आहे.
या कॉन्ट्रॅक्टची गरज का भासली आणि हे का योग्य आहे यासंदर्भात असित मोदी यांनी स्पष्टिकरण दिलं आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत असित मोदी यावर बोलले.
काय म्हणाले असित मोदी
प्रेक्षकांनी मालिकेवर भरभरून प्रेम केलं. कारण यातील व्यक्तिरेखा या एक्सक्लुसिव्ह होत्या. त्यातील कलाकार इतर कुठे लोकांना दिसत नव्हते. आता या मालिकेतील कलाकार इतर ठिकाणी काम करु लागतील तर अर्थातच मालिकेचं महत्त्व कमी होणार. मालिकेतील कोणताही कलाकार सोडून जातो, तेव्हा मला प्रचंड दु:ख होतं. कारण आमच हे एक कुटुंब आहे. मी सर्वांना मालिकेत आणलं आहे. मी नेहमी सर्वांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी कधीच अहंकार आडवा येऊ दिला नाही. सगळ्यांनी सोबत मिळून काम करावं आणि यशाचा आनंद घ्यावा, इतकीच माझी इच्छा आहे. पण जर का कुणाला शो सोडायचाच असेल तर मी काय करू शकतो? लोकांनी या मालिकेतील कलाकारांना खूप प्रेम दिलं आहे,त्यामुळे ते जेव्हा मालिका सोडतात तेव्हा अर्थातच प्रेक्षकही दु:खी होणारच. प्रेक्षक मला देखील मेसेज करतात, त्यांची नाराजगी जाहीर करतात..., असे ते म्हणाले.
नुकतंच तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी मालिका सोडली आहे. अद्याप ते अधिकृतरित्या काहीही बोललेले नाहीत. पण शैलेश लोढा आता ‘वाह भाई वाह’ या शो मध्ये दिसत आहेत. शैलेश लोढा यांच्या एक्झिटविषयी बोलताना मोदी म्हणाले की, ‘कोणाच्या जाण्यानं मालिका थांबणार नाही. जुने कलाकार परत आले तर त्यांचे स्वागतच आहे पण नाही आले तरी नवीन तारक मेहता नक्कीच येतील’.