Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘टप्पू’ मालिका सोडणार? वाचा, काय आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 01:01 PM2021-12-10T13:01:43+5:302021-12-10T13:02:13+5:30
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : राज अनादकत मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे. मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी ( Asit Kumarr Modi) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरची सर्वाधिक लोकप्रिय मालिका सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. होय, गेल्या 13 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या काळात अनेक कलाकारांनी मालिका सोडली. आता काय तर टप्पूची भूमिका साकारणारा राज अनादकत (Raj Anadkat) हा देखील मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे. मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी ( Asit Kumarr Modi) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
2017 पर्यंत भव्या गांधी मालिकेत टप्पूची भूमिका साकारत होता. भव्या गेला आणि त्याच्या जागी राज अनादकत हा ‘टप्पू’ म्हणून आला. विशेष म्हणजे फार कमी वेळात टप्पू म्हणून तो लोकप्रिय झाला. परंतु ‘कोईमोई’ने दिलेल्या वृत्तानुसार, लवकरच राज सुद्धा मालिका सोडणार आहे.
राज मालिका का सोडतोय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर टीमसोबतचे मतभेद. रिपोर्टनुसार, राजने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या टीमसोबत बराच ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यात अपयशी ठरला. त्यामुळे आता ना त्याला मालिकेत काम करायची इच्छा आहे, ना टीम त्याला थांबवण्याच्या मन:स्थितीत आहे. मध्यंतरी राज आणि जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेत दिलीप जोशी यांच्यात खटके उडाल्याची चर्चा होती. अर्थात दिलीप जोशी यांनी हे वृत्त फेटाळलं होतं. त्याआधी राज आणि बबीताजी अर्थात मूनमून दत्ता यांच्या अफेअरच्या चर्चेचा एक अंक गाजला होता. राज स्वत:पेक्षा अनेक वर्ष मोठ्या मूनमूनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं गेलं होतं. दोघांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
या सर्व कारणांमुळे राज ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडत असल्याचा अंदाज आहे. अद्याप राजने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मला ठाऊक नाही...
राज ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सोडणार, हे खरं आहे का? असं विचारलं असता असित कुमार मोदी यांनी याबद्दल आपल्याला काहीही ठाऊक नसल्याचं सांगितलं. मला काहीही माहित नाही, असं ते म्हणाले.