'तारक मेहता...'चा रोशन सिंग सोढी रुग्णालयात दाखल, गुरुचरण सिंहने रुग्णालयातून शेअर केला video
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 18:12 IST2025-01-07T18:12:28+5:302025-01-07T18:12:58+5:30
व्हिडिओ पाहून सोढीचे चाहते चिंतेत पडले आहेत.

'तारक मेहता...'चा रोशन सिंग सोढी रुग्णालयात दाखल, गुरुचरण सिंहने रुग्णालयातून शेअर केला video
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) पुन्हा चर्चेत आहे. ५२ वर्षीय अभिनेता काही महिन्यांपूर्वीच गायब झाला होता. सुरुवातीला त्याचं अपहरण झालं असं बोललं गेलं पण नंतर तो स्वत:हूनच परत आला होता. कर्जाच्या ओझं, नैराश्य यामुळे तो काही दिवस अध्यात्मिक मार्गावर गेला होता. तर आता गुरुचरण रुग्णालयात अॅडमिट झाला आहे. त्याने रुग्णालयातूनच व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ पाहून सोढीचे चाहते चिंतेत पडले आहेत.
गुरुचरण सिंहने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो रुग्णालयात दिसत आहे आणि बेडवर झोपला आहे. त्याच्या हाताला सलाईन लावली आहे. व्हिडिओमध्ये तो रुग्णालयातलं दृश्य दाखवतो आणि म्हणतो, "तब्येत खूप जास्त खराब झाली आहे. ब्लड टेस्ट झाली आहे. लवकरच सांगेन."
गुरुचरणच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याला लवकरात लवकर बरे होण्याचा सल्ला दिला आहे. काही दिवसांपूर्वी गुरुचरणच्या वडिलांचीही तब्येत बिघडली होती. त्यांचं हिमोग्लोबिन कमी झालं होतं. त्यांना दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या गुरुचरण सुद्धा आता रुग्णालयात असल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे.