जान्हवीच्या मंगळसूत्राशी तेजश्रीचं आहे खास कनेक्शन, म्हणाली- "माझ्या आयुष्यातील ती पहिली गोष्ट..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 11:36 IST2024-12-21T11:35:32+5:302024-12-21T11:36:09+5:30
तेजश्रीने अजूनही जपून ठेवलंय जान्हवीचं मंगळसूत्र कारण...

जान्हवीच्या मंगळसूत्राशी तेजश्रीचं आहे खास कनेक्शन, म्हणाली- "माझ्या आयुष्यातील ती पहिली गोष्ट..."
'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरात पोहोचली. मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा असणाऱ्या तेजश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेने तिला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. या मालिकेतील तिने साकारलेली जान्हवी प्रेक्षकांना आपल्या घरातील वाटत होती. जान्हवीचं हसण्याबरोबर आणि काहीही हा श्री या डायलॉगबरोबर तिच्या मंगळसूत्राचीही प्रचंड चर्चा रंगली होती. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतील जान्हवीचं हे मंगळसूत्र तेजश्रीने अजूनही जपून ठेवलं आहे.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तेजश्रीने जान्हवीच्या मंगळसूत्राशी तिचं खास कनेक्शन असल्याचं आणि ते अजूनही जपून ठेवल्याचा खुलासा केला. "'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतील जान्हवीचं मंगळसूत्र खूप फेमस झालं होतं. आजही कुठल्या ज्वेलरी शॉपमध्ये गेलं तरीदेखील त्याबद्दल बोललं जातं. माझ्या आयुष्यात फेमस झालेली ती पहिली गोष्ट होती. त्यामुळे मी ते मंगळसूत्र अजूनही जपून ठेवलं आहे", असं तेजश्री तारांगण या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
तेजश्री सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तिने काही सिनेमांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तेजश्री मुख्य भूमिकेत असलेला 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात तेजश्रीसोबत सुबोध भावे मुख्य भूमिकेत आहे.