"दत्तगुरुंच्या पायावर आजारपण सोडलं..." जुई गडकरीला झाला होता गंभीर आजार, अशी झाली होती अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 02:44 PM2024-08-01T14:44:15+5:302024-08-01T14:46:42+5:30
स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली.
Jui Gadkari : स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेमुळे अभिनेत्री जुई गडकरीच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने जुई प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. 'पुढचं पाऊल', 'सरस्वती' तसेच 'वर्तूळ' अशा मालिकांमध्ये जुई मुख्य भूमिकेत झळकली. गेल्या दीड वर्षांपासून 'ठरलं तर मग' मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शिवाय टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका अव्वल स्थानावर आहे. सोज्वळ, सालस असलेली जुई आज मालिका विश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे. परंतु, तिचा इथपर्यंतचा प्रवास फार काही सोपा नव्हता. असंख्य अडचणींवर मात करत सध्याच्या घडीला अभिनेत्री टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय चेहरा बनली आहे.
अलिकडेच जुईने 'दिल के करीब' ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्यतील कठीण प्रसंगावर भाष्य केलं. 'दिल के करीब' मध्ये तिने २०१३ पासून तिला ज्या शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागलं याबाबत सांगितलं. या मुलाखतीत ती म्हणते, "त्यावेळेस मला बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या. मला प्रोलॅक्टिन ट्युमर निघाला होता. माझा अख्खा स्पाईन डॅमेज झाला होता. म्हणजे सर्व्हायकलसह लम्बरमध्ये सगळा स्पाईन डॅमेज होता. त्यात मी 'Rheumatiod Arthritis' पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे डॉक्टरांनी मला जिम, डान्स ट्रेकिंग सगळं बंद करायला सांगितलं. जमिनीवर बसायचं नाही, पळायचं नाही तसेच वाकायचं नाही, वजन उचलायचं नाही शिवाय ड्राईव्ह करायचं नाही असं त्यांनी मला सांगितलं होतं. अशा गोष्टींमुळे मी झोपू शकत नव्हते. कित्येक महिने मी बसून झोपत होते".
आध्यात्मिक गोष्टींकडे वळले-
पुढे जुई म्हणाली, "या काळामध्ये केवळ सकारात्मकतेमुळे या आजारावर मी मात केली. याच काळात मी गोळ्या फेकून दिल्या कारण त्याचे परिणाम माझ्या शरीरावर जाणवत होते. मी माझ्या जेवणात बदल केला. या सगळ्यात मला दत्तगुरुंची साथ लाभली. दत्तगुरुंवरील श्रद्धेमुळे मी या आजारांवर मात केली".
या विषयी सांगताना जुई म्हणाली," मी दत्त महात्म्याचं रोज एक पान वाचते आणि पूर्ण तन्मयतेने ते वाचते. मी आजही माझं आजारपण महाराजांच्या पायावर सोडलं आहे. त्याच्यानंतर माझा जो काही त्रास होता तो कमी झाला. माझं जे काही होईल ते दत्तगुरु बघून घेतलं. आज मी माझ्या पायांवर उभी आहे ती दत्तगुरुंची कृपा आहे".