'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याची हिंदी लघुपटात वर्णी, म्हणाला, "असे संदेश देणारे चित्रपट यायला हवे"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 05:03 PM2024-03-18T17:03:07+5:302024-03-18T17:03:37+5:30
अभिनेत्याने नुकतंच एका मुलाखतीत सिनेमाविषयी माहिती दिली आहे.
स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिकेत अर्जुनच्या मित्राची भूमिका साकारणारा अभिनेता चैतन्य सरदेशपांडे (Chaitanya Sardeshpande) लवकरच हिंदी सिनेमात झळकणार आहे. 'एक सुलगता सवाल' या हिंदी सिनेमात त्याची वर्णी लागली आहे. ज्येष्ठ अभिनेते धनंजय सरदेशपांडे यांचा चैतन्य मुलगा आहे. चैतन्यने नुकतंच एका मुलाखतीत सिनेमाविषयी माहिती दिली आहे.
मुलगाच हवा असा हट्ट आजही अनेक कुटुंबात होतो. मुलीच्या लग्नाचा खर्च, हुंडा या सर्व कारणांमुळे आधी मुलगी नको असायचीय पण आता मुलगी का नको याचं कारण बदललं आहे. ते काय कारण आहे हे या लघुपटात दाखवण्यात आलं आहे. 'एक सुलगता सवाल' हा एक लघुपट आहे. याविषयी चैतन्य म्हणाला, 'मला वाटतं जास्तीत जास्त फिल्ममेकर्सने सामाजिक संदेश देणारे चित्रपट आणले पाहिजेत. समाजाला अशा सिनेमांची गरज आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून असे विचार सर्वांसमोर आणण्याची आवश्यकता आहे.'
'एक सुलगता सवाल' या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रदीप दळवी यांनी केलं आहे. तर प्रभू कुंज प्रॉडक्शन कंपनीने सिनेमाची निर्मिती केली आहे. अभिनेत्री ज्योत्स्ना विल्सन, सुप्रिया गायगे आणि ज्योती निसाल यांचीही सिनेमात भूमिका आहे. हा लघुपट राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्येही झळकणार आहे.