'तू तेव्हा तशी' मालिकेतील अभिनेत्रीचा अपघात, पायाला झाली दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 07:58 PM2023-06-20T19:58:14+5:302023-06-20T19:58:49+5:30
Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' मालिकेतील अभिनेत्रीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
झी मराठी वरील तू तेव्हा तशी (Tu Tevha Tashi) या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुमानी खरे (Rumani Khare) हिचा अपघात झाला असून तिच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. ही बातमी खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे. तिला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
रुमानी खरे हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. रुमानीच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले असून तिचा पाय प्लास्टर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी रुमानीने तिच्या या अपघाताबद्दल सोशल मीडियावर सांगितले होते. तिची पोस्ट पाहून तिला तिच्या मित्रमंडळींनी काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. मजेशीर बाब म्हणजे रुमानीच्या बाबांनी म्हणजेच संदीप खरे यांनी तिच्या पायावरच्या या प्लास्टरवर आता एक कविता सुद्धा लिहिली आहे. द आर्ट अँड द आर्टिस्ट म्हणत तिने बाबांसोबतचा एक मजेशीर फोटो इंस्टा स्टोरीवर शेअर केला होता. ‘हुए है पांव ही पहले नबर्दे इश्क में जख्मि, न भागा जाए है मुझसे न ठहरा जाए है मुझसे ‘ अशा आशयाची ही कविता तिच्या प्लास्टरवर लिहिली आहे.
रुमानीच्या पायाला फ्रॅक्चर कसं झालं याबद्दल तिने खुलासा केला नसला तरी तिला तिच्या चाहत्यांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तू तेव्हा तशी या मालिकेतून रुमानीने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. या मालिकेत तिने शिल्पा तुळसकरच्या मुलीची म्हणजेच राधाची भूमिका निभावली होती. याआधी तिने बालकलाकार म्हणून चिंटू या चित्रपटात झळकली होती. चिंटू २ याही चित्रपटात रुमानीने बालकलाकाराच्या भूमिकेत काम केले होते.